सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : राज्यात डान्सबार बंदी असतानाही नवी मुंबईत नावापुरतीच बंदी असल्याचे दिसून येत आहे. शहरातील प्रत्येक नोडमध्ये डान्सबार चालवले जात आहेत. मध्यरात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी ‘छम-छम’ चालत असतानाही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईची दुसरी ओळख ही डान्सबारचे शहर म्हणूनही राज्यभर होऊ लागली आहे. त्यानुसार बारचालकांमध्येही ग्राहक खेचण्यासाठी सुरू असलेल्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणात कायद्याचे उल्लंघन होत आहे. मात्र, त्यांच्याकडून उघडपणे नियमांची पायमल्ली होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क व पोलीस यांच्याकडून डोळेझाक होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच काही बारचालकांनी सोयीनुसार वाढीव बांधकामेही केली आहेत. त्यापैकी काही ठिकाणांवर पालिकेकडून कारवाईचा दिखावा होत असून, उर्वरित ठिकाणी अर्थपूर्ण हितसंबंध जोपासले जात आहेत. संबंधित सर्वच प्रशासनांच्या छुप्या पाठिंब्यामुळेच डान्सबारचालकांना पूर्णपणे मोकळीक मिळत असल्याचे दिसून येत आहे.सर्व्हिस बारच्या नावाखाली चालणाºया बहुतांश बारमध्ये डान्सबार चालवले जातात. त्यामध्ये शहरातील प्रत्येक नोडमध्ये चार ते पाच याप्रमाणे संपर्ण पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १०० हून अधिक ठिकाणी डान्सबार चालत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक डान्सबार पनवेल परिसरात चालत आहेत. त्या ठिकाणी महिला वेटर कामगारांचा वापर नाचकामासाठी होत आहे. त्यांच्यावर पैशाची उधळण करून बारमध्येच अश्लील चाळे चालत असल्याचा प्रकार कोपरखैरणेतील आदर्श बारच्या केलेल्या पाहणीत समोर आले आहे.काही बारचालकांनी बारच्या जागेतच छुप्या खोल्या तयार केल्या आहेत. त्या ठिकाणी वेश्याव्यवसाय चालत असल्याचेही समोर आले आहे. एमआयडीसी परिसरातील बंद कंपन्यांच्या जागी अथवा कामी मोकळ्या जागेत बांधकाम करून सर्व्हिस बारच्या नावाखाली डान्सबार चालवले जात आहेत. त्या ठिकाणी बारबालांवरून ग्राहकांमध्ये हाणामारीच्याही घटना घडत आहेत, तर परवानाधारक आॅर्केस्ट्रा बारमध्येही नियमांचे उल्लंघन होत आहे.प्रत्येक पोलीस ठाणेअंतर्गत चालणाºया डान्सबारची माहिती स्थानिक पोलिसांना असतानाही त्यावर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांत गुन्हे शाखेमार्फत अशा काही बारवर कारवायाही करण्यात आल्या आहेत; परंतु कारवार्इंत पुन्हा त्या ठिकाणी ‘छम-छम’चा आवाज येत आहे. त्यापैकी काही बारबाला व तिथल्या सर्व्हिसचा बोलबाला मुंबईसह पुण्यात असल्याने हौशी ग्राहकही नवी मुंबईत केवळ ‘छम-छम’ पाहण्यासाठी हजेरी लावत असल्याचे दिसून येत आहे.शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या डान्सबार चालत असतानाही उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांचे त्यावर कारवाईकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तर स्थानिक पोलिसांकडून वरिष्ठांच्या नजरेत स्वत:ची बाजू सुरक्षित राखण्यासाठी प्रत्येक महिन्याला ठरावीक बारवर किरकोळ कारवाई करण्याचा नित्य नियमित कार्यक्रम सुरू असल्याचेही दिसून येत आहे; परंतु संबंधित सर्वच प्रशासनांच्या दुर्लक्षामुळे शहराची प्रतिमा मलीन होत चालली आहे. सर्व्हिस बारमध्ये वेटरच्या नावाखाली मान्यतेपेक्षा जादा बारबालांची भरती करून त्यांनाच गाण्याच्या तालावर ठुमका धरायला लावला जात आहे. त्याशिवाय ग्राहकांना लुभावण्यासाठी टेबलभोवतीच ग्राहकांनाही बारबालांसोबत नाचण्याची मुभा दिली जात आहे. या वेळी काही ग्राहकांकडून पैशांचीही उधळण केली जात आहे.बेकायदेशीरपणे डान्सबार चालवणाºया काही सर्व्हिस बारमध्येच बांधकाम करून छुप्या खोली तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ग्राहकांना मर्जीनुसार बारबालांसोबत वेश्याव्यवसाय करण्याचीही सोय करून देण्यात आली आहे. तर काही बारव्यावसायिकांनी परिसरातील लॉजसोबत तशी बांधणी करून ठेवली असून, बारबाला व ग्राहकांची वाहतूक करण्यासाठी रिक्षांचीही व्यवस्था करून दिलेली आहे.
शहरातील ‘छम-छम’ थांबेना, कारवाईकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 12:41 AM