नवी मुंबई : शहरातील २०० उद्यानांपैकी नेरूळमधील वंडर्स पार्कला शहरवासीयांची सर्वाधिक पसंती मिळू लागली आहे. साडेचार वर्षांमध्ये तब्बल १२ लाख ५९ हजार नागरिकांनी भेट दिली आहे. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाल्याने उद्यानामधील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहरामध्ये जवळपास २०० उद्याने उभारली आहेत. नेरूळमधील वंडर्स पार्क हे सर्वात मोठे उद्यान आहे. १५ डिसेंबर २०१२ मध्ये उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून उद्यानाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली आहे. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने रोज १५०० ते २ हजार नागरिक उद्यानाला भेट देत आहेत. सुरवातीला चार हायटेक राईड व टॉय ट्रेन एवढाच पर्याय होता. परंतु मागील वर्षभरामध्ये मुलांसाठी चार नवीन राईड उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. खेळण्यासाठीही मोठ्या प्रमाणात जागा असल्याने व सुरू केलेल्या फुडकोर्टमुळे उद्यानाला भेटी देणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. अॅम्पी थिएटरमध्ये अनेक कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे. ३० एप्रिलपर्यंत उद्यानामध्ये १२ वर्षे वयोगटावरील तब्बल ९ लाख ९३ हजार नागरिकांनी भेट दिली आहे. १ ते १२ वर्षे वयोगटातील २ लाख ६६ हजार मुलांनी भेट दिली असल्याची नोंद झाली आहे. भेट दिलेल्या नागरिकांपैकी ५ लाख ३५ हजार नागरिकांनी राईड्सचा उपयोग केला आहे. ४ लाख नागरिकांनी टॉय ट्रेनचा उपयोग केल्याची नोंद करण्यात आली आहे. उद्यानामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. अजूनही येथे येणाऱ्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पण शहरात यापेक्षा दुसरा चांगला पर्याय कोणताच नसल्याने सुट्टीमध्ये वंडर्स पार्कमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. वंडर्स पार्कमध्ये लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये वाढ करण्याची मागणी पालकांनी केली आहे. मुलांच्या संख्येच्या तुलनेमध्ये खेळणी अत्यंत कमी आहेत. यामुळे मुलांना मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा करावी लागत आहे. राईड्स व तिकीट विक्रीच्या ठिकाणी गर्दी झाल्यास अतिरिक्त तिकीट विक्री केंद्र तत्काळ सुरू करावे अशी सूचनाही येथे येणाऱ्या नागरिकांनी केली आहे. अॅम्पी थिएटर व फुड कोर्टच्या बाजूला असलेल्या जागेचा योग्य उपयोग केला जात नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली करण्यात आली आहे. सायन्स पार्क लवकर सुरू करावेवंडर्स पार्कच्या एक बाजूला सायन्स पार्कसाठी विस्तीर्ण भूखंड मोकळा पडला आहे. याठिकाणी सायन्स पार्क उभारण्यासाठीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. उद्यानाच्या दुसऱ्या टप्याचे काम वेळेत केले व विकसित केलेल्या उद्यानामधील त्रुटी दूर केल्यास महाराष्ट्रातील सर्वात चांगल्या उद्यानामध्ये वंडर्स पार्कचा समावेश होईल असे मत भेट देणाऱ्या नागरिकांनी केले आहे.
पालिकेच्या वंडर्स पार्कला शहरवासीयांची पसंती
By admin | Published: May 03, 2017 6:11 AM