प्रशासनाच्या मनमानीमुळे शहराची कचराकुंडी

By admin | Published: July 12, 2016 02:53 AM2016-07-12T02:53:25+5:302016-07-12T02:53:25+5:30

ओला व सुका कचरा वेगळा केला नसल्याचे कारण देऊन पालिकने दोन दिवस कचराच उचलला नाही. प्रत्येक सोसायटीमध्ये कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत.

The city's garbage canal due to the arbitration of the administration | प्रशासनाच्या मनमानीमुळे शहराची कचराकुंडी

प्रशासनाच्या मनमानीमुळे शहराची कचराकुंडी

Next

नवी मुंबई : ओला व सुका कचरा वेगळा केला नसल्याचे कारण देऊन पालिकने दोन दिवस कचराच उचलला नाही. प्रत्येक सोसायटीमध्ये कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. पदपथ व रोडवर कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. पालिकेच्या या हुकूमशाही कारभाराविषयी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या वृत्तीचा निषेध करण्यास सुरुवात झाली आहे.
महापालिका आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या धाडसी निर्णयामुळे पालिकेच्या कारभाराला शिस्त लागली असून, उत्पन्नातही वाढ होऊ लागली आहे. त्यांच्याविषयी प्रत्येक नागरिकाच्या मनात आदर निर्माण झाला असताना अचानक ओला व सुका कचरा वेगळा न करणाऱ्या सोसायट्यांमधील कचराच न उचलण्याचे आदेश त्यांनी घनकचरा विभागाला दिले आहेत. यामुळे अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये दोन ते तीन दिवस कचरा उचलला जात नाही. सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच साठलेल्या कचऱ्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरू लागली आहे. अनेक सोसायट्यांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्यास सुरुवात केली आहे. परंतु काही नागरिक अद्याप नियमांचे पालन करीत नाही. त्याची शिक्षा सर्वांनाच भोगावी लागत आहे. पावसाळ्याचे दिवस असून साठलेल्या कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोसायटी आवाराप्रमाणे सार्वजनिक कचरा कुंडीतील कचराही उचलला जात नाही. नेरूळ, जुईनगर, सानपाडा व इतर सर्वच परिसरामध्ये कचरा कुंड्यांमध्ये कचरा टाकण्यासाठी जागाच शिल्लक नाही. रोडवर व पदपथावर कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे दिसू लागले आहेत.
ओला व सुका कचरा वेगळा करणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. परंतु वर्षानुवर्षे लागलेली सवय तत्काळ कशी जाणार? काही सोसायट्यांमध्ये ५० ते ५०० घरे आहेत. काही नागरिक नियमाप्रमाणे ओला व सुका कचरा वेगळा करतात. परंतु काही नागरिक एकाच ठिकाणी कचरा टाकत आहेत. ज्यांनी नियमांचे पालन केले नाही त्यांची शिक्षा सरसकट सर्वांना भोगावी लागत आहे. घनकचरा विभागाची हुकूमशाही सुरू झाली आहे. कचरा न उचलल्यामुळे शहरात प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन महिने आयुक्तांचे कौतुक करणारे नागरिक आता त्यांच्या मनमानीविषयी नाराजी व्यक्त करू लागले आहेत. पालिका प्रशासनाने मनमानी थांबविली नाही तर आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली आहे. नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करीत आहेत. नगरसेवक अधिकाऱ्यांना फोन करतात, पण अधिकारी फोनच उचलत नाहीत. यामुळे लोकप्रतिनिधीही हतबल झाले आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कचरा रोडवर व पालिकेत टाकून प्रशासनाचा निषेध केला जाणार आहे.

आरोग्याशी खेळ थांबवा
ओला व सुका कचरा वेगळा करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. परंतु कचरा वेगळा केला नाही म्हणून तो न उचलण्याचा निर्णय ही प्रशासनाची मनमानी आहे. हुकूमशाही पद्धतीने घनकचरा विभागाचे अधिकारी व कर्मचारी वागत आहेत. विनंती करूनही कचरा उचलत नाहीत. अधिकारी फोन उचलत नाहीत. ओला व सुका कचरा वेगळा केला तरच कचरा उचलला जाईल, असे सांगितले जात आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, तो थांबविण्याची मागणी केली जात आहे.

नगरसेवकही अडचणीत
कचरा उचलला जात नसल्याने नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करीत आहेत. सकाळपासून लोकप्रतिनिधींचे फोन खणखणू लागले आहेत. आमच्या सोसायटीमधील कचरा उचलला नाही, कचरा उचलणारे कर्मचारी ऐकत नाहीत, तुम्ही काहीतरी करा, अशा विनंत्या केल्या जात आहेत. अधिकारी नगरसेवकांचे फोनही घेत नाहीत. प्रशासनाच्या या मनमानीचा फटका नगरसेवकांनाही बसत आहे.

आंदोलनाची तयारी सुरू
पालिकेच्या मनमानीविरोधात आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. यापुढे कचरा उचलला नाही तर तो रोडवर टाकण्याचा इशारा नेरूळमधील काही सोसायट्यांतील नागरिकांनी दिला आहे.
यानंतरही मनमानी सुरूच राहिली तर विभाग कार्यालय, पालिका मुख्यालयात कचरा टाकून निषेध व्यक्त केला जाणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या समस्येविषयी मौन धरले असून, त्यांच्याविषयी नागरिकांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: The city's garbage canal due to the arbitration of the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.