शहरातील ओव्हरलोड वाहतुकीला आरटीओचे अभय?
By admin | Published: May 5, 2017 06:20 AM2017-05-05T06:20:50+5:302017-05-05T06:20:50+5:30
अवजड वाहनांतून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे आरटीओने
कमलाकर कांबळे / नवी मुंबई
अवजड वाहनांतून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राजरोसपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे आरटीओने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने नियमबाह्य वाहतुकीला चालना मिळत असल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी ही नियमबाह्य पध्दती बंद करावी, यासाठी काही वाहतूकदारांनीच आता बंड पुकारल्याने येत्या काळात हा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबईच्या उरण व पनवेल परिसरातून खडी, क्रॅश सॅण्ड आदी बांधकाम साहित्याने भरलेले हजारो डंपर दरदिवशी मुंबईच्या विविध उपनगरांत जातात. या प्रत्येक डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक टन माल भरलेला असतो. अशाप्रकारे ओव्हरलोड मालाची वाहतूक करणे नियमबाह्य आहे. कायदेशीर गुन्हा असतानाही सर्रासपणे वाहतूक केली जात आहे. पनवेल येथील येथील गव्हाण कोपरा, जासई आणि कुंडेवाडा येथून खडी आणि क्रश सॅण्डची मुंबई उपनगरात वाहतूक केली जाते. त्यासाठी दिवसाला तब्बल दीड हजार ओव्हरलोडेड डंपर सायन-पनवेल महामार्गे मुंबईच्या विविध उपनगरांत दाखल होतात. त्यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या महामार्गावर टप्प्याटप्प्यावर खडी व क्रश सॅण्डने ओव्हरलोड भरलेले डंपर दिसून येतात. वाशी जकात नाक्यावर तर सकाळी ८ ते ११ या वेळेत डंपरच्या लांबच्या लांब रांगा दिसून येतात. ही वस्तुस्थिती असतानाही शहरात अशा प्रकारे अवैध वाहतूक होत नसल्याचा दावा नवी मुंबई आरटीओकडून केला जात आहे. विशेष म्हणजे ओव्हरलोड वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी भरारी पथके तैनात केल्याचे नवी मुंबईचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी स्पष्ट केले आहे. सायन-पनवेल महामार्गावरून दिवस-रात्र मुंबईच्या दिशेने जाणारे ओव्हरलोडेड डंपर या पथकाच्या नजरेत पडत नाहीत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकूणच या अवैध प्रकाराला आरटीओ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून अप्रत्यक्ष अभय मिळत असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे.
दरम्यान, क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणारे हे रॅकेट बंद करण्याची मागणी काही वाहतूकदारांनी केली आहे. डंपरमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. टायर पंक्चर होवून अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहनांच्या दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. या अवैध वाहतुकीमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. इतकेच नव्हे तर त्यामुळे वाशी खाडी पुलाला धोका निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर संबंधित विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी डंपर चालकांनी केली आहे.
रिपब्लिकन सेनेचा इशारा
अवजड वाहनांतून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीच्या विरोधात रिपब्लिकन सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे तातडीने या वाहतुकीला प्रतिबंध घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष जीवन रा. गायकवाड यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल आरटीओला निवेदन दिले आहे.