शहरातील सोसायट्यांमध्ये ओल्या कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:34 AM2018-01-17T01:34:10+5:302018-01-17T01:34:10+5:30
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी घराघरात जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी घरामध्येच ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासोबतच
नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी घराघरात जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी घरामध्येच ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासोबतच अनेक मोठ्या सोसायट्या व हॉटेलच्या आवारातच ओल्या कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबविण्यासही सुरुवात झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच उद्यानातही पानाफुलांच्या हरित कचºयापासून खतनिर्मिती करण्यासाठी कंपोस्ट पिट्स उभारण्यात आले असून, वेळोवेळी याठिकाणी पाहणी केली जात असून प्रत्यक्षात या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद नोंदविला जात आहे. अत्याधुनिक स्वरूपाच्या यंत्रणेद्वारे ओल्या कचºयापासून खतनिर्मितीचा अद्ययावत प्रकल्प लुब्रीझॉल कंपनीने उभारला असून महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी स्वत: या आधुनिक प्रकल्पाला भेट देऊन तेथील कार्यपद्धतीची पाहणी केली. कंपनीच्या उपाहारगृहात दररोज निर्माण होणाºया साधारणत: २८ किलो ओल्या कचºयावर या अत्याधुनिक यंत्रात प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जाते. या खताचा वापर करून उद्योग समूहाच्या ३७ एकर परिसरात ठिकठिकाणी फुलविलेल्या बागा, हिरवळ आच्छादित जागा विकसित करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी ठरावीक अंतरावर मोसमी फुलांचे ताटवे तयार करून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. या मोसमी फुलांमुळे परिसराचे रूप बदलून जाते हे बघून प्रभावित होत आयुक्तांनी अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र सुशोभित दिसावे व शहर सौंदर्याला झळाळी लाभावी याकरिता शहरात विशिष्ट दर्शनी जागांवर मोसमी फुले लावावीत अशा सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या.
सानपाडा येथील मिलेनियम टॉवर बी टाईपमध्ये तेथील रहिवाशांनी जागरूकता दाखवली असून, ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करणारे अत्याधुनिक यंत्र बसविले आहे. अत्यंत कमी जागा लागणारी व प्रभावीपणे कचºयापासून खतनिर्मिती करणारी ही यंत्रणा ओल्या कचºयाचे क्र शिंग करून वेगाने खतनिर्मिती करते. या खताचा वापर सोसायटीतील १००हून अधिक फ्लॅटधारक आवारातील उद्यान सुशोभीकरणासाठी वापरतात. मोठी लोकवस्ती असलेल्या मिलेनियम टॉवर डी टाइपमधील ३३६ फ्लॅटधारकांनी सोसायटी आवारात कंपोस्ट पिट्सद्वारे खतनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे.