पालिका क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 01:42 AM2021-02-09T01:42:43+5:302021-02-09T01:42:53+5:30
पालिकेच्या स्थापनेला ४ वर्षांचा कार्यकाळ लोटला तरीदेखील अद्याप या ठिकाणच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा गाडा अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर आहे.
- वैभव गायकर
पनवेल : कोविडमध्ये उद्भवलेल्या आरोग्याच्या परिस्थितीमुळे या वर्षी अर्थसंकल्पात सरकारने आरोग्यावर फोकस केला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातदेखील सहा नागरी प्राथमिक केंद्रांचा समावेश आहे. पालिकेच्या स्थापनेला ४ वर्षांचा कार्यकाळ लोटला तरीदेखील अद्याप या ठिकाणच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा गाडा अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर आहे.
पालिका क्षेत्रात कोविड रुग्णांनी ३० हजारांचा पल्ला गाठला आहे. कोविड काळात या आरोग्य केंद्रांचा वापर अँटिजेन चाचण्या तसेच लहान आजारांवर औषधोपचार मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहेत. इतर वेळादेखील सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात आरोग्य केंद्रांचा वापर करीत असतात. मात्र सध्याच्या घडीला ही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रेच आजारी असल्याचे दिसून येत आहे. पालिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची तब्बल १०५ पदे रिक्त असून केवळ ८० कर्मचाऱ्यांच्या आधारावर या आरोग्य केंद्राचे काम सुरू आहे.
एकीकडे पालिकेच्या लोकसंख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे इतर कामाचा बोजा पडत आहे. लवकरात लवकर रिक्त पदे भरण्याची गरज आहे, यापूर्वी यापैकी काही आरोग्य केंद्रे सिडकोच्या ताब्यात होती. वर्षभरापूर्वीच या आरोग्य केंद्रांचे हस्तांतरण पालिकेकडे झाले आहे.
७ डॉक्टरांची आवश्यकता असताना सध्याच्या घडीला केवळ ३ डॉक्टर पालिकेत कार्यरत आहेत. ६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांची जबाबदारी या ३ डॉक्टरांवर आहे. अद्यापही ४ डॉक्टरांची आवश्यकता असताना आणि पदे मंजूर असतानादेखील ४ डॉक्टरांची पदे अद्याप रिक्तच आहेत. विशेष म्हणजे १०५ रिक्त पदांमध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात आरोग्य विभागाला अडचण निर्माण होत असून इतर कर्मचाऱ्यांवर हा भार पडत आहे.
उपसंचालक आरोग्य सेवा मुंबई, ठाणे मंडळ यांच्या माध्यमातून रिक्त जागा भरण्यास मंजुरी मिळाली आहे. लवकरच सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर नव्याने या रिक्त जागा भरल्या जातील.
- डॉ आनंद गोसावी (मुख्य वैद्यकीय अधिकारी , पनवेल महानगरपालिका )