नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2016 01:25 AM2016-04-12T01:25:20+5:302016-04-12T01:25:20+5:30

कोपरखैरणे परिसराला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. एमआयडीसी क्षेत्रात चालणारे अनियंत्रित दगडखाणीतील उत्खनन, कारखान्यातून प्रक्रिया न करता खाडीत सोडले जाणारे

Civil health risks | नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next

नवी मुंबई : कोपरखैरणे परिसराला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. एमआयडीसी क्षेत्रात चालणारे अनियंत्रित दगडखाणीतील उत्खनन, कारखान्यातून प्रक्रिया न करता खाडीत सोडले जाणारे रसायनमिश्रित सांडपाणी आदीमुळे हा परिसर प्रदूषित झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्यमान धोक्यात आले आहे. यासंदर्भात वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याने येथील रहिवाशांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रहिवाशांच्या एक शिष्टमंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवनियुक्त क्षेत्रीय अधिकारी अनिल मोहेकर यांची भेट घेऊन यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली. ठाणे-बेलापूर रस्त्याच्या एका बाजूला आशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत तर दुसऱ्या बाजूला नागरी वसाहती आहेत. यात प्रामुख्याने ऐरोली, घणसोली व कोपरखैरणे या नोड्सचा समावेश आहे. औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असते. परंतु अनेक कारखानदार या नियमाला फाटा देत हे रसायनमिश्रित पाणी शेजारच्या खाडीत सोडून देतात. त्यामुळे खाडीतील पाणी दूषित होऊन स्थानिकांच्या पारंपरिक मासेमारीच्या व्यवसायावर गंडांतर आले आहे. त्याचबरोबर नागरी आरोग्यही धोक्यात आले आहे.
औद्योगिक क्षेत्रातून सोडल्या जाणाऱ्या या दूषित सांडपाण्यामुळे नागरी वसाहतीतील नालेही प्रदूषित झाले आहेत. कोपरखैरणे सेक्टर ११ या वसाहतीच्या समोरील बाजूस पावणे एमआयडीसी आहे. येथील रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी प्रक्रिया न करताच पावणे नाल्यात सोडले जाते. या नाल्यातून २४ तास उग्र वास येतो. त्यातून विषारी गॅस बाहेर पडत असल्याने त्यामुळे श्वसन, दमा, टीबी, कॅन्सर अशा जीवघेण्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
आमदार संदीप नाईक व स्थानिक नगरसेवक मुनावर पटेल यांच्यासमवेत रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून नव्यानेच नियुक्त अनिल मोहेकर यांची भेट घेतली. यातील गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना करण्याची मागणी नाईक यांनी केली. यासंदर्भात चौकशी करून सकारात्मक कारवाई करण्याचे आश्वासन मोहेकर यांनी दिल्याचे सेक्टर ११ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सौरभ पंड्या यांनी सांगितले.

कोपरखैरणे रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशनने (सेक्टर ११) या संदर्भात मागील काही महिन्यांपासून जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. संबंधित खात्याचे मंत्री, सचिव, महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण बोर्ड आदींना पत्र पाठवून प्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Civil health risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.