नवी मुंबई - डासांचे प्रमाण वाढले आहे. औषध फवारणी वेळेवर केली जात नाही. औषधामध्ये भेसळ केली जात आहे. ठेकेदार मोठे झाले; पण डासांची समस्या जैसे थे असल्याचा आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केला आहे.नवी मुंबईमध्ये डासांचे प्रमाण वाढले आहे. खाडी किनारी असलेल्या वसाहतीमध्ये ही समस्या गंभीर आहे. सायंकाळी घरामध्ये थांबणे शक्य होत नाही. उद्यान व मैदानांमध्येही थांबता येत नाही. डेंग्यू, मलेरियाचे प्रमाण वाढत आहे. साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली आहे. या समस्येचे पडसाद स्थायी समितीमध्येही उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक अशोक गुरखे यांनी या समस्येकडे सभागृहाचे लक्ष वेधले. शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, औषध फवारणीचे प्रमाण वाढविले पाहिजे, असे सांगितले. सायंकाळीही फवारणी करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. देविदास हांडे पाटील यांनी डास व अळीनाशक औषध फवारणी करणारे ठेकेदार कामचुकारपणा करत असल्याचा थेट आरोप केला. डास मारणारे ठेकेदार मोठे झाले; पण समस्या मात्र संपलेली नाही. ठेकेदारांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. नगरसेवकांच्या घर व कार्यालयाजवळ औषध फवारणी केल्याचे भासविले जाते. शहरातील इतर ठिकाणी फवारणी केली जात नाही. गटारांमध्ये धुरीकरण व औषध फवारणी केल्यानंतर गटाराचे झाकण गोणपाटाने बंद करणे आवश्यक असते; परंतु ठेकेदार फक्त दिखावेगिरी करत आहेत. नागरिक नगरसेवकांकडे तक्रारी करतात. नगरसेवकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासन व ठेकेदार त्याकडे लक्ष देत नाहीत. प्रशासनाने औषध फवारणीचे ठेके रद्द करावे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.ऐरोली सेक्टर १५ व खाडी किनारी असलेल्या वसाहतीमध्येही डासांचे प्रमाण वाढले असल्याचे नगरसेविका संगीता पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. होल्डिंग पाँडची साफसफाई करण्यात आलेली नाही. यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशीच स्थिती राहिली तर परिसरात वास्तव्य करणे शक्य होणार नाही. नागरिक वारंवार याविषयी तक्रारी करत असतात. होल्डिंग पाँडचे सुशोभीकरण करण्यासाठीही वारंवार पाठपुरावा करूही प्रशासन लक्ष देत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. द्वारकानाथ भोईर, ऋचा पाटील यांनीही या समस्येकडे लक्ष वेधले. आरोग्य अधिकारी दयानंद कटके यांनी औषध फवारणी एक वेळ केली जात आहे. सदस्यांच्या सूचनांचा विचार करून औषध फवारणी दोन वेळा करण्याच्या सूचना देण्यात येतील, असेही स्पष्ट केले.महापालिका क्षेत्रामध्ये डासांची समस्या वाढली आहे. डेंग्यू, मलेरिया व साथीचे अजार पसरण्याची शक्यता आहे. सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा आदर करून प्रशासनाने तत्काळ योग्य उपाययोजना करावी.- शुभांगी पाटील,स्थायी समिती सभापतीडासांची समस्या कमी झाली नाही; पण औषध फवारणी करणारे ठेकेदार मात्र मोठे झाले. ठेकेदार निष्काळजीपणा करत असल्यामुळे सर्व ठेके रद्द करण्यात यावेत.- देविदास हांडे-पाटील,नगरसेवक,प्रभाग-४२ऐरोलीमधील होल्डिंग पाँडची साफसफाई केली जात नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. नागरिक लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार करत असतात. प्रशासनाने औषध फवारणी वाढवावी व होल्डिंग पाँडचे लवकरात लवकर सुशोभीकरण करावे.- संगीता अशोक पाटील,नगरसेविका, प्रभाग-१५शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून औषध फवारणीचे प्रमाण वाढविण्यात यावे.- अशोक गुरखे, प्रभाग-१०२खाडीकिनारी असलेल्या वसाहतीमध्ये डासांचे प्रमाण जास्त आहे. सायंकाळी उद्यानांमध्येही थांबणे शक्य होत नाही. प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन धुरीकरण व औषध फवारणीचे प्रमाण वाढवावे.- द्वारकानाथ भोईर, गटनेते, शिवसेना
डासांमुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 7:01 AM