नेवाळीच्या जागेवर अनंत परांजपे यांचा दावा

By admin | Published: June 26, 2017 01:32 AM2017-06-26T01:32:35+5:302017-06-26T01:32:35+5:30

नेवाळीतील धावपट्टीची जमीन परत मिळावी म्हणून शेतकरी आंदोलन करीत असताना ज्येष्ठ वकील अनंत चिंतामणी परांजपे यांनीही

Claim of Anant Paranjpe in Navowali's place | नेवाळीच्या जागेवर अनंत परांजपे यांचा दावा

नेवाळीच्या जागेवर अनंत परांजपे यांचा दावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : नेवाळीतील धावपट्टीची जमीन परत मिळावी म्हणून शेतकरी आंदोलन करीत असताना ज्येष्ठ वकील अनंत चिंतामणी परांजपे यांनीही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे नवा वाद उपस्थित झाला असून आता सारी भिस्त गॅझेटमधील नोंदी आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदी, कागदपत्रांवर आहे.
जागेचे मूळ मालक गोविंद गणेश जोगळेकर होते, असा दावा त्यांचे जावई असलेल्या परांजपे यांनी केला. त्यांनी प्रदीर्घ काळ वकिली केली आहे. त्यांची पत्नी शकुंतला याही वकील होत्या. शकुंतला या गोविंद जोगळेकर यांची धाकटी कन्या. परांजपे हे बरीच वर्षे ठाण्यात राहत होते. सध्या ते माहिमला राहतात. संपर्क साधल्यावर परांजपे म्हणाले, ‘माझे सासरे गोविंद गणेश कुलकर्णी हे कल्याणचे. कल्याणमध्ये ते १९१० साली आले. त्यांना नेवाळी व मांगरुळ येथील जमीन इनामी मिळाली होती. त्यांच्या नावे मोठी जमीन होती. ब्रिटिश सरकारने १९४२ साली जोगळेकर यांच्या नावे असलेली नेवाळी व मांगरुळ येथील जमीन बळजबरीने धावपट्टीसाठी घेतली. जोगळेकर हेच त्या जमिनीचे मालक होते. याच्या नोंदी मुंबई गॅझेट आणि ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात सापडतील.’ त्याची कागदपत्रे परांजपे यांच्याकडे सध्या उपलब्ध नाहीत. ब्रिटीशांनी जोगळेकरांची जमीन धावपट्टीसाठी घेतली. पण १९४५ साली दुसरे महायुद्ध संपुष्टात आल्यावर ही जागा पुुन्हा देण्यात आली नाही. भारताला स्वातंत्र मिळाल्यावर ही जागा भारत सरकारच्या ताब्यात गेली. १९५७ साली कूळ कायदा आला. जमीन सरकारची झाली. त्यावरील जोगळेकर यांचा ताबा गेला. ही जागा इनामी असल्याने शेतकऱ्यांनी त्यावरील त्यांचा ताबा सिद्ध करायला हवा. मगच जमीन त्यांच्या मालकीची होते, असे म्हणता येईल.
गोविंद जोगळेकर यांचे नातू किरण जोगळेकर हे साहित्यिक व कवी आहेत. ते कल्याणला राहतात. त्यांच्याकडे विचारणा केल्यावर ते म्हणाले, नेवाळी-मांगरुळ याच भागातील जमीन आजोबांच्या नावे होती, एवढेच नाही, तर वांगणी, कांबा येथील जागा आजोबांच्या नावे होती. आजोबांना मी पाहिलेले नाही. ते हयात असताना त्यांनी कल्याणच्या नमस्कार मंडळाला देणगी दिली होती. देगणीदारांच्या पाटीवर त्यांच्या नावाचा उल्लेख होता. त्यांच्यासमोर नगराध्यक्ष असा उल्लेख करण्यात आला होता. यावरुन ते कल्याणचे माजी नगराध्यक्ष होते आणि तेही ब्रिटिशकालीन पालिकेच्यावेळी असे लक्षात येते. त्यांच्या नावावर जागा होती. पण त्याचे काही दस्तावेज आता उपलब्ध नाहीत.
संघर्ष समितीचा पाठिंबा
शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाव्या, यासाठी जमीन बचाव आंदोलन समितीच्या सुरू असलेल्या आंदोलनाला २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीने पाठिंबा दिला आहे. समितीच्या नेत्यांनी रविवारी भाल गावात जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील, पांडुरंग म्हात्रे, बाळाराम ठाकूर, दत्ता वझे, भाल गावातील तुळशीराम म्हात्रे आदी यावेळी उपस्थित होते.


आणखी १६ आंदोलकांना मानपाडा पोलिसांकडून अटक
१हिललाईन पोलिसांनी शनिवारी चार आंदोलकांना अटक केल्यानंतर रविवारी मानपाडा पोलिसांनी आणखी १६ आंदोलकांना अटक केली आहे. त्यामुळे अटकेतील व्यक्तींची संख्या २० झाली आहे. आधी अटक केलेल्या चौघांना मंगळवारपर्यंत कोठडी देण्यात आली, तर उरलेल्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. आंदोलकांनी मात्र अजून पोलिसांविरोधात गुन्हा दाखल केलेला नाही.२नेवाळीतील शेतजमिनींवरून झालेल्या उग्र आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष उद्धव ठाकरे यांचा दौरा, मुख्यमंत्री आणि संरक्षण राज्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडे लागले आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पुरावे गोळा करण्यासाठी गावातील नेत्यांची आणि महसूल खात्याची लगबग सुरू आहे.ब्रिटिशांनी घेतलेल्या जमिनींचा मूळ करार, त्याची भरपाई, नंतर संरक्षण खात्याकडे आणि पुढे नौदलाकडे सोपवलेला ताबा याची माहिती या बैठकांत घेतली जाणार आहे. ३शेतकऱ्यांना जमिनी परत करायच्या की भरपाईबद्दल नवा तोडगा काढायचा की पर्यायी जमीन द्यायची याबबातचे वेगवेगळे प्रस्ताव यात समोर येण्याची शक्यता आहे. जमिनीचा ताबा सोडण्यास संरक्षण खाते तयार होते का, यावरच सर्व बाबी अवलंबून आहे. या आंदोलनात आणि जमिनी बेकायदा बिल्डरांना दिल्याने महसूली यंत्रणेवर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्या यंत्रणेने प्रत्येक मुद्द्याचे पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली आहे. भाजपचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील वगळता अन्य मंत्र्यांनी आंदोलक, जखमींकडे पाठ फिरवली.

Web Title: Claim of Anant Paranjpe in Navowali's place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.