नवी मुंबई- कोकण सरसमुळे बचतगटांच्या उत्पादनासाठी एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बदलत आहे. असे प्रतिपादन कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी आज कोकण सरस प्रदर्शन 2019 च्या उद्घाटन प्रसंगी केले.या कार्यक्रमास एम.एस.आर.एल.एम.चे संचालक रविंद्र शिंदे, ठाणे जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश चव्हाण उपायुक्त (विकास) भारत शेंडगे, प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते, प्रकल्प संचालक प्रकाश देवऋषी, सहायक आयुक्त दिपाली देशपांडे,मंजिरी व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ पाटील म्हणाले, बचत गटांमुळे महिला एकत्र येतात. महिला एकत्रित आल्या तर विचारांची देवाण-घेवाण होऊन सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. एकूणच महिला एकत्रित आल्या की, आपले कुटुंब, गांव व समाजाचा विकास करतात. कोकणाला निसर्गाने वरदान दिलेले आहे. कोकणात पर्यटकांची गर्दी वर्षभर असते. त्यामुळे येथील उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळते. त्यामुळे बचतगटांनी आपल्या उत्पादनाचे उत्पादन वर्षभर चालू ठेवले पाहिजे. आपण पर्यटकांसाठी कायमस्वरूपी भोजनव्यवस्था निर्माण केल्या पाहिजेत. तालुक्यातील बचत गटांनी एकत्र येवून काम केले पाहिजे. आपल्या उत्पन्नाची गुंतवणूक आरोग्य व शिक्षणात केली पाहिजे. बचत गटासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले जाते, त्याचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे. प्रशिक्षणातून तुमच्या वस्तूंचा दर्जा उंचावतो व मुल्यवृधी मिळते.
एम.एस.आर.एल.एम.चे संचालक रविंद्र शिंदे म्हणाले महिलांचा आर्थिक विकास, सबलीकरण व स्वावलंबी होण्यासाठी बचतगट हे साधन उपयोगी आहे. बचतगटांनी आपल्या मालाचा दर्जा उंचावून स्पर्धेत आपला माल बाजारात कसा विकला जाईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत कार्यरत असलेल्या स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ मिळण्यासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर सरस प्रदर्शने दरवर्षी भरविण्यात येतात. मुंबई मध्ये महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळते. या अभियानाच्या माध्यातून विभागातून 12 हजार 846 स्वयंसहाय्यता गट निर्माण करण्यात आले आहेत. राज्यात 3 लाख 60 हजार स्वयंसहाय्यता गट निर्माण करण्यात आले आहेत. अस्मिता बाजाराच्या माध्यमातून बचत गटांची उत्पादने ऑनलाईनही खरेदी करण्यात येतात.ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी यावेळी समयोचित भाषण केले. चिरनेर येथील महिला बचत गटाच्या प्रमुख श्रीमती शंकुतला हरिभाऊ चिरनेरकर यांनी त्यांच्या बचत गटांनी उत्पादित केलेली मातीची भांडी यावेळी मान्यवरांना भेट दिली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उपायुक्त (विकास) भारत शेंडगे म्हणाले, महिला बचत गट, उत्पादक तसेच ग्राहक यांच्यामधील साखळी कमी करुन उत्पादकांचा माल ग्राहकांपर्यत पोहचविण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. या बचत गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण होते. यावर्षी प्रदर्शनात सुमारे 100 महिलाबचत गटांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये ठाणे-24, रायगड-36, रत्नागिरी -8, पालघर-8, सिंधुदूर्ग-9 व इतर जिल्ह्यातील -15 बचत गट सहभागी झाले आहेत.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, रायगड व ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण विभाग व जिल्हा स्तरीय कोकण सरस विक्री व प्रदर्शन २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सिडको अर्बन हट, सी. बी. डी. बेलापूर नवी मुंबई येथे असून दि. 27 फेब्रुवारी ते दि ३ मार्च 2019 या कालावधीत सुरू राहणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील बचत गटातील महिला व कोंकण विभागातील शासकीय अधिकारी उपस्थित होते.