- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईगृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बांधल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांमुळे वाद उद्भवू लागले आहेत. एकाच जातीच्या लोकसंख्येचा आधार घेत ही बांधकामे केली जात आहेत. अशावेळी इतर धर्मीयांच्या भावना दुखावत असून असा धार्मिक तिढा घणसोली येथे सिडकोनिर्मित वसाहतीमध्ये निर्माण झाला आहे.स्मार्ट सिटी म्हणून ओळख निर्माण करत असलेल्या नवी मुंबईत विविध जाती-धर्माच्या नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे कॉस्मोपॉलिटन शहर म्हणून देखील नवी मुंबई ओळखली जाते. त्यानुसार नवी मुंबईत स्थायिक होण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्यांसाठी सिडकोने गृहनिर्माण प्रकल्प राबवलेले आहेत. अशा गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सर्वधर्मीय नागरिक वास्तव्य करत आहे. अशातच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बांधली जाणारी अनधिकृत धार्मिक स्थळे वादाचा मुद्दा ठरु लागली आहेत. ज्या जाती-धर्मीय लोकांची संख्या जास्त असेल ते त्यांच्या संख्याबळावर त्यांच्या धर्माची प्रार्थनास्थळे बांधत आहेत. अशावेळी सोसायटीतल्या इतर धर्मीयांना दुजाभावाची वागणूक मिळत असल्याच्या भावनेने धार्मिक तेढ निर्माण होत आहे. असाच धार्मिक तिढा घणसोली सेक्टर ९ घरोंदा येथील श्री सिध्दिविनायक सोसायटीमध्ये निर्माण झाला. सोसायटी कमिटीच्या मंजुरीने सोसायटी आवारात एक धार्मिक स्थळ उभारण्यात आले आहे. त्याकरिता सोसायटीच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकाची केबिन तोडण्यात आलेली आहे. याचवेळी सोसायटीमधील काही सदस्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे बहुउद्देशीय सभागृह बांधण्याची सूचना मांडली असता कमिटीने त्यास मंजुरी देखील दिली. मात्र दीड वर्षापूर्वी मंजूर झालेला सभागृहाचा प्रस्ताव कमिटीने सप्टेंबर २०१५ मध्ये झालेल्या बैठकीत फेटाळला. सोसायटी आवारात अनधिकृत बांधकाम नको असल्याचे कारण यावेळी सांगण्यात आले. मात्र मंदिर अनधिकृत उभारले जात असताना केवळ सभागृहाला विरोध का? यावरुन सोसायटीत धार्मिक तेढ निर्माण झाली. सोसायटीच्या बैठकांमध्ये चर्चेऐवजी वाद होवू लागल्याने सोसायटी अध्यक्ष महेंद्र खिल्लारी व सोसायटीत बौध्द समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुरेश कांबळे यांनी एकमेकांविरोधात पोलिसांकडे तक्रारही केली. हा वाद सोडवण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांनी बैठक घेवून तोडगा काढण्याचे प्रयत्न करुनही तोडगा निघालेला नाही. त्याउलट कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांवर सोसायटीनेच कारवाईच्या नोटिसा बजावल्याने दोन धर्मीयांमध्ये तणाव निर्माण झाला. सोसायटी कमीटीकडून सर्व सदस्यांना समभावाची वागणूक दिली जाते. मंदिर बांधल्यानंतर सोसायटी आवारात इतर एकही अनधिकृत बांधकाम नको असा कमिटीचा निर्णय आहे. मात्र सभागृह अधिकृतपने बांधण्याबाबत सिडकोकडे पाठपुरावा सुरु आहे.- महेंद्र खिल्लारी, अध्यक्ष, श्री सिध्दिविनायक सोसायटी
धार्मिक स्थळांवरून वाद
By admin | Published: January 14, 2016 3:36 AM