नवी मुंबई : अवैध प्रवासी वाहतुकीवरून रिक्षाचालकांच्या दोन गटांत जबर हाणामारीची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून ८हून अधिकजण फरार आहेत. घनसोली रेल्वेस्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात बोगस रिक्षा चालत असून यापूर्वीही त्यांच्यात वाद झालेले आहेत. यानंतरही आरटीओकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा संताप नागरिकांकडून व्यक्त करत आहेत.शहरात सर्वच ठिकाणी बोगस रिक्षा चालवल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे. बोगस रिक्षाचालकांकडून इतर रिक्षाचालकांवर दादागिरीही होत असल्यामुळे अधिकृत व अनधिकृत रिक्षाचालकांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. त्यापैकी काही रिक्षाचालक गुन्हेगारी पार्श्वभूमीचेही आहेत. त्यांच्याकडून प्रवासी व पादचारी यांना होत असलेल्या दादागिरीची तक्रार स्थानिक नगरसेविका उषा कृष्णा पाटील यांनी यापूर्वीच वाहतूक पोलिसांजवळ केलेली आहे. यानंतरही त्या ठिकाणच्या रस्त्यावरचा अवैध रिक्षाथांबा बंद करण्यात आलेला नव्हता. शुक्रवारी पुन्हा एकदा घनसोलीत रिक्षाचालकांच्या दोन गटांत हाणामारी होऊन एकमेकांवर दगडफेक झाल्याची घटना घडली. त्याशिवाय लाकडी दांडक्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या रिक्षांचीही तोडफोड करण्यात आली. भरदिवसा घनसोली रेल्वेस्थानकाबाहेर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. अखेर एका प्रत्यक्षदर्शींने पोलिसांना कळवताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला; परंतु दोन्ही बाजूचा जमाव नियंत्रणात येत नसल्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला. या वेळी ७ जण पोलिसांच्या हाती लागले तर उर्वरित ८ ते १० जण पळून जाण्यात यशस्वी झाले. दिनेश पाटील, नामदेव पाटील, आप्पा वाडकर, जयेश इंगळे, राजेश वाशिवले, विक्रम मढवी, सुप्रीम पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्या सर्वांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. तर घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त प्रशांत खैरे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांनीही घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला. (प्रतिनिधी)
बोगस रिक्षाचालकांच्या दोन गटांत हाणामारी
By admin | Published: March 26, 2017 5:20 AM