घणसोलीत तरुणांच्या दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:42 PM2019-04-08T23:42:52+5:302019-04-08T23:42:53+5:30
चाकूने हल्ला : मैदाने, चौक बनताहेत अड्डे
नवी मुंबई : तरुणांच्या दोन गटांत हाणामारीची घटना घणसोली घरोंदा परिसरात घडली आहे. यामध्ये एकाचा गळा चिरून हत्येचा प्रयत्न झाला असून दुसऱ्याच्या डोक्यात दगड मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारांमुळे मोकळी मैदाने व चौकांमध्ये दिवस-रात्र जमणाऱ्या टोळक्यांमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
नवी मुंबईत मंडळांच्या नावाखाली गल्लीबोळात दादा-भाई तयार होत आहेत. ऐरोली, नेरुळ, कोपरखैरणे तसेच घणसोली परिसरात अशा तरुणांच्या टोळ्या बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारातून घणसोली घरोंदा येथे दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. त्यांच्यातल्या वादाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र या वादातून एकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्येचा प्रयत्न झाला. तर त्याच्या मदतीला धावणाºयाच्याही डोक्यात दगड मारून त्याचीही हत्या करण्याचा प्रयत्न झाला. सिम्पलेक्स व घरोंदा परिसरातील तरुणांच्या टोळीतल्या वादातून ही हाणामारी घडल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये साईनाथ मुत्तल व शैलेश टोम्पे हे दोघे गंभीर जखमी आहेत. तर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी स्वप्निल चिकणे, रोहित औताडे, नितीन लांबे, सागर पाटील, किरण पाटील आदींच्या विरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घणसोलीत एएसपी शाळेच्या समोरील मैदानात हा प्रकार घडला. तरुणांचे घोळके हुल्लडबाजी करीत असल्याने महिला-मुलींमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होत आहे. गटागटाने बसणाºया अशा टोळ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. परंतु बहुतांश टोळ्या राजकीय छत्रछायेखाली पोसल्या जात असल्याने कारवाईकडे चालढकल होत असल्याचे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.