परीक्षेदरम्यान दहावीच्या विद्यार्थिनीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 05:24 AM2019-08-14T05:24:01+5:302019-08-14T05:24:40+5:30
वाशीतील मॉडर्न स्कूलमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. सदर विद्यार्थिनी तुर्भेची राहणारी असून दहावीत शिकत होती
नवी मुंबई : वाशीतील मॉडर्न स्कूलमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. सदर विद्यार्थिनी तुर्भेची राहणारी असून दहावीत शिकत होती.
सायली अभिमान जगताप (१४) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. तुर्भेतील आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते अभिमान जगताप यांची ती मुलगी आहे. मंगळवारी तिची शाळेत दहावीची परीक्षा होती. परीक्षेसाठी ती शाळेत गेली. दप्तर ठेवण्यासाठी ती वर्गातून बाहेर आली होती. त्याच वेळी ती चक्कर येऊन जमिनीवर कोसळली होती. यामुळे तिला तत्काळ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. सायलीची प्रकृती ठीक होती, शिवाय ती कसल्याही मानसिक तणावात नव्हती, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. यामुळे शाळेत चक्कर येऊन पडण्यामागचे नेमके कारण कळू शकलेले नाही. दरम्यान, नातेवाइकांनी शाळेतील सीसीटीव्ही तपासले असता, त्यातही संशयास्पद असे काही दिसले नसल्याचे नातेवाईक यशपाल ओहोळ यांनी सांगितले. त्यानुसार, सायलीच्या मृत्यूच्या ठोस कारणाचा उलगडा करण्यासाठी बुधवारी शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.