नवी मुंबई : स्वच्छता अभियानात देशात तीसरा क्रमांक मिळविल्यानंतर महानगरपालिकेने देशात पहिला क्रमांक मिळविण्याचा निर्धार करून अभियानाला गती दिली आहे. शहरभर स्वच्छतीर्थक्षेत्र अभियानही राबविले जात आहे. वाशीतील पुरातन जागृतेश्वर मंदिरापासून अभियानाची सुरूवात झाली आहे.
वाशी सेक्टर ६ मध्ये पुरातन जागृतेश्वर मंदिर असून महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या उपस्थितीमध्ये परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात झाली. आयुक्तांसह अधिकाऱ्यांनीही येथे श्रमदान केले. यावेळी माजी नगरसेवक दशरथ भगत, फशीबाई भगत, यांच्यासह देवस्थान ट्रस्टचे विश्वस्तही उपस्थित होते. कोपरखैरणे विभागातील पुरातन पावणेश्वर मंदिर परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मनपा अधिकाऱ्यांसह माजी नगरसेवक शशिकांत भोईर व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्तांनी शहरतील पुरातन मंदिरांना भेटी देवून विश्वस्थांसह नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. नियमीतपणे स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना केल्या.
नवी मुंबई महानगरपालिकेच्यावतीने रस्ते, पदपथ, उद्याने स्वच्छ केली जातात. महत्वाच्या ठिकाणी सुशोभीकरण केले जाते. यावर्षापासून मंदिरांच्या परिसरामध्येही लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानामध्ये आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, बाबासाहेब राजळे, शिरिष आरदवाड, सहाय्यक आयुक्त सागर मोरे, सुनिल काठोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
निर्माल्यावर प्रक्रिया होणार
मंदिर परिसरामध्ये टाकावूनमधून टिकावू वस्तू तयार करण्यास प्राधान्य द्यावे. मंदिर परिसरात संकलीत होणारे निर्माल्य,फुले, प्रसाद यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिका प्रोत्साहन देणार आहे. निर्माल्यातून खत निर्मीती करून त्याचा उपयोग परिसरातील हिरवळ विकसीत करण्यासाठी होणार आहे.