योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच उल्लेखनीय कामगिरी केली असून, सन २०२०-२१ पासून महाराष्ट्रात पहिला क्रमांक, तर राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक संपादन केला आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेस पुरस्कारापोटी आतापर्यंत ५६ कोटी एवढी रक्कम जाहीर झालेली असून, आणखी काही पारितोषिक रक्कम जाहीर होणे बाकी आहे. स्वच्छ सर्वेक्षणाप्रमाणेच माझी वसुंधरा अभियानातही नवी मुंबईने उल्लेखनीय यश संपादन केले असून, २४ कोटी इतकी रक्कम पारितोषिकापोटी महानगरपालिकेस प्राप्त झाली असल्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने देशात स्वच्छ शहरांमध्ये द्वितीय (तांत्रिकदृष्ट्या तृतीय) क्रमांकाचे मानांकन प्राप्त केले असून, महाराष्ट्र राज्यात नेहमीप्रमाणेच पहिले स्थान कायम राखले आहे. शहराचे सर्वोच्च 'सेव्हन स्टार' मानांकन नवी मुंबई शहराने प्राप्त केले असून, हे मानांकन प्राप्त करणाऱ्या देशातील केवळ दोन शहरांमधील नवी मुंबई हे एक शहर असून, राज्यातील एकमेव शहर आहे. मागील वर्षी नवी मुंबईला फाईव्ह स्टार मानांकन प्राप्त झाले असून, यावर्षी 'सेव्हन स्टार' मानांकन प्राप्त झालेले आहे. हागणदारीमुक्त शहरांच्या ओडीएफ कॅटेगिरीत नवी मुंबई शहराने 'वॉटरप्लस' हे सर्वोच्च मानांकन कायम राखले आहे. 'माझी वसुंधरा' अभियान सन २०२३ मध्ये 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत राज्यात 'क' वर्ग महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईने पर्यावरणशील शहराचे प्रथम मानांकन प्राप्त केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या पारितोषिक रकमांचा विनियोग नागरी सुविधा पुरविण्यासाठी केला जात असून, यामधून नवी मुंबईच्या स्वच्छता, सुशोभीकरण व पर्यावरणात लक्षणीय काम करण्यात येत असल्याचे महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी सांगितले.