नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : येथील जेएनपीए बंदर परिसरात अनेक ठिकाणी असलेल्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचे टँकर धुण्यात येत आहेत. मात्र, पर्यावरणाला हानीकारक असलेल्या या कृत्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. याबाबत पर्यावरणप्रेमी आणि मच्छीमारांनी टँकर धुतल्यानंतर बाहेर फेकल्या जाणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यामुळे कुठे मासे मरत असल्याची तर कुठे माती प्रदूषित होत असल्याची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
जेएनपीए कंटेनर फ्रेट स्टेशनजवळील सोनारी येथील अशाच एका सेवा केंद्रात दररोज किमान १० टँकर स्वच्छ केले जातात, असे महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जेएनपीए परिसरात अशी अनेक टँकर सेवा केंद्रे आहेत जिथून घातक रसायनांचे टँकर धुतले जात असून त्या माध्यमातून घातक रसायने थेट खाडीत जात असल्याने मोठ्या प्रमाणात मासे मारले जात असल्याचे ते म्हणाले.
दोषींवर कारवाई हवी
रसायनांचे टँकर धुण्याचे प्रकार नियमित अंतराने घडत असून याचा परिसरातील जैवविविधतेवर परिणाम होतो, असे हितेश कोळी, अध्यक्ष - गव्हाण कोळीवाडा, फिशिंग सोसायटी यांनी सांगितले. यामुळे यातील दोषींवर तत्काळ एफआयआर दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पर्यावरणाचीही हानी
रसायनांचे टँकर अशाप्रकारे कोणतेही नियमांचे पालन न करता उघड्यावर धुण्याचे प्रकार गंभीर असून यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने पर्यावरणाची हानी होत असल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या ई मेलमध्ये म्हटले आहे.
मच्छीमारांच्या उपजीविकेवर परिणाम
भरती-ओहोटी आणि कमी भरतीच्या प्रवाहासह, रसायने ओलसर जमिनीपर्यंत पोहोचतात आणि शेवटी खाडीत आणि जिथे बरेच मासे मारतात. या बेकायदेशीर प्रक्रियेचा केवळ मासेमारी समुदायाच्या दैनंदिन व्यापारावर परिणाम होत नाही तर मातीसुद्धा प्रदूषित होत आहे, असे कुमार म्हणाले. यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी अशा घटनांकडे डोळेझाक करत आहेत. अशा घटनांमुळे पारंपरिक मच्छिमारांना मोठी किंमत मोजावी लागत असून त्यांच्या उपजीविकेचे पारंपरिक साधन संपत चालले असल्याचे नंदकुमार पवार म्हणाले.