लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत १ ते १५ मे दरम्यान विशेष अभियानाचे आयोजन केले आहे. या अंतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या सफाई कामगारांचा विशेष गौरव करण्यात येत आहे.स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबईला देशात ८ वे व राज्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे. या यशामध्ये शहरातील सफाई कामगारांचा वाटा मोठा आहे. कामगार नियमितपणे साफसफाईचे काम प्रामाणिकपणे करत असल्यामुळे पालिकेला देशपातळीवरील स्पर्धेत यश मिळविता आले. याच अभियानाचा भाग म्हणून सफाई कामगारांचा सन्मान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी दिघा विभाग कार्यालयामध्ये साफसफाई कामगारांचा सन्मान करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये कामगारांना पुरस्कार देवून सन्मानित केले. याशिवाय कामगार व नागरिकांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण व्हावे यासाठी एकमेकांना मैत्रीचा धागा बांधण्यात आला. कामगारांसाठी प्रथमच विभाग कार्यालयामध्ये भोजनाचे आयोजन केले होते. कामगारांना स्वच्छतेची शपथ देवून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये अशाप्रकारे कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दिघा विभाग कार्यालयात आयोजित कार्यक्रमास विभाग अधिकारी प्रकाश वाघमारे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, राजेंद्र इंगळे, सुधाकर वडजे, राजू बोरकर, तेजस ताटे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सफाई कामगारांचा पालिकेकडून सत्कार
By admin | Published: May 13, 2017 1:20 AM