नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत महापालिकेने शहर स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णालये, नर्सिंग होम आदी परिसरात भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी व रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.भारत सरकारच्या स्वच्छ शहर अभियानाचा एक भाग म्हणून महापालिकेने गेल्या पंधरा दिवसांपासून स्वच्छतेचा धडाका सुरू केला आहे. त्याचप्रमाणे शहर हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने ठोस कार्यवाही करण्यात येत आहे. या मोहिमेला चांगले यश येताना दिसत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या पंधरवड्यात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत शहरातील रुग्णालये आणि नर्सिंग होम परिसराची स्वच्छता करण्यात आली. मंगळवारी महापालिकेचे माता बाल संगोपन केंद्र, नागरी आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रांना कचराकुंड्यांचे वाटप करण्यात आले. परिमंडळ १ चे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, परिमंडळ २ चे उपायुक्त अमरिश पटनिगीरे, वैद्यकीय अधिकारी रमेश निकम आदींच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. (प्रतिनिधी)
रुग्णालय परिसरात स्वच्छता मोहीम
By admin | Published: February 16, 2017 2:16 AM