- योगेश पिंगळेनवी मुंबई : केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे स्वच्छ शहर अभियान सुरू असल्याने नवी मुंबई महापालिकेने शहरात सार्वजनिक, सामुदायिक शौचालय, ई-टॉयलेट, शी-टॉयलेट, स्मार्ट टॉयलेट आदी नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने उभारले आहेत. तसेच या अभियानामुळे जुन्या प्रसाधनगृहांची देखील दुरु स्ती करून नवीन झळाळी दिली आहे. चालकांची मनमानी थांबवून जादा पैसे घेणे थांबविले आहे.स्वच्छ सर्वेक्षण २0१७ अभियानामध्ये नवी मुंबई शहराचा स्वच्छतेत देशात आठवा आणि राज्यात पहिला क्र मांक आला होता. गेल्यावर्षी झालेल्या याच सर्वेक्षणामध्ये घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात देशात सर्वोत्तम शहर म्हणून बहुमान मिळाला होता. या वर्षी स्वच्छतेत देशात पहिला क्र मांक पटविण्याचे स्वप्न महापालिका प्रशासनाने उराशी बाळगले असून नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्पर्धा, सुविधा, योजना, राबविल्या जात आहेत. नवी मुंबई शहर १00 टक्के हागणदारीमुक्त करण्याचा संकल्पदेखील पालिका प्रशासनाने केला आहे. यासाठी विभाग स्तरावर सर्वेक्षण करून उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबांना वैयक्तिक घरगुती शौचालये बांधून देण्यात आली होती. काही ठिकाणी शौचालय उभारण्यास तांत्रिक अडचण असल्याने त्या कुटुंबांकरिता सामुदायिक शौचालयाचे बांधकाम करून त्यामध्ये सीट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. शहर हागणदारी मुक्त करण्याच्या अनुषंगाने सुविधा उपलब्ध करून देऊनही झोपडपट्टी भागातील नागरिक उडघ्यावर शौचास जात असल्याने उपद्रव पथकांच्या माध्यमातून पालिकेने अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून लाखो रु पयांचा दंड देखील वसूल केला आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी शहरातील सर्वच जुन्या शौचालयांची डागडुजी करण्यात आली आहे. तसेच महिला, लहान मुले, अपंग नागरिक यांच्यासाठी स्मार्ट टॉयलेटची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. शौचालयांच्या स्वच्छतेबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वच सार्वजनिक आणि सामुदायिक शौचालयांमध्ये गेल्यावर्षी मशिन बसविण्यात आल्या होत्या; परंतु या सर्वच मशिन बंद पडल्या आहेत.लाखो रुपये खर्च करून डागडुजी केलेल्या काही सामुदायिक शौचालयात स्वच्छ अभियान सुरू असताना देखील काही ठिकाणी स्वच्छता व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शौचालयांमध्ये हॅन्ड वॉश लिक्विड, टिशू पेपरच्या मशिन बसविण्यात आल्या आहेत; परंतु या बंद आहेत. काही जुन्या शौचालयांचे दरवाजे तुटलेले, गंजून खराब झालेले असताना फक्त सर्वेक्षणासाठी रंगकाम करून चकाकी देण्यात आली आहे. अभियानानंतर देखील स्वच्छता राखणे महापालिकेपुढे आव्हान असणार आहे.काही ठिकाणी मनमानीप्रसाधनगृहचालकांनी महापालिकेने ठरवून दिलेली रक्कमच नागरिकांकडून घेणे बंधनकारक आहे; परंतु सारसोळे डेपो, वाशी डेपो व इतर काही ठिकाणी नागरिकांकडून चार ते पाच रुपये घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. शुल्क किती घेण्यात यावे, याविषयी फलकही लावण्यात आलेले नाहीत. नागरिकांनी तक्रार करायची असल्यास तक्रार नोंदवहीही ठेवण्यात आलेली नाही.दिव्यांगांच्या शौचालयांना कुलूपस्वच्छ सर्वेक्षणाच्या निमित्ताने महापालिकेने शहरात दिव्यांग नागरिकांना रॅम्पसह सर्व सोयी-सुविधायुक्त स्मार्ट टॉयलेट बनविले आहेत; परंतु या टॉयलेटच्या दरवाजांना कुलूप लावले असल्याने दिव्यांग नागरिकांना या टॉयलेटचा वापर करता येत नाही.नवीन ठेकेदाराची नियुक्तीमहानगरपालिकेने विभागनिहाय ठेकेदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयीचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. ठेकेदाराने २४ तास प्रसाधनगृह सुरू ठेवणे बंधनकारक आहे. याशिवाय जिओ टॅगिंगचा वापर करून प्रत्येक दोन तासाने रिपोर्टिंग करणे आवश्यक आहे. नवीन ठेकेदारांना लवकर कार्यादेश देऊन निविदेमधील अटी-शर्तीप्रमाणे काम करून घेणे आवश्यक आहे.
स्वच्छ अभियानामुळे स्वच्छतागृहांना झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 1:18 AM