शिरढोणमधील हुतात्मा स्मारकाची साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 04:52 AM2018-10-28T04:52:30+5:302018-10-28T04:52:44+5:30
स्मारकाच्या दुरवस्थेविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ साफसफाई सुरू केली आहे.
नवी मुंबई : राज्य शासनाने मुंबई-गोवा महामार्गावर शिरढोणमध्ये हुतात्मा स्मारक उभारले आहे. स्मारकाच्या दुरवस्थेविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ साफसफाई सुरू केली आहे.
शिरढोण हे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव आहे. गावामध्ये फडके यांचा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. गावातील स्मारक व प्रदर्शन केंद्राव्यतिरिक्त शासनाने महामार्गावरही हुतात्मा स्मारक उभारले आहे; परंतु त्याची देखभाल केली जात नव्हती. एका वर्षापूर्वी ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर येथील इमारतीच्या नूतणीकरणाचे काम सुरू केले आहे; परंतु इमारतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या विषयी ‘लोकमत’ने पुन्हा वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने तत्काळ साफसफाईची कामे सुरू केली आहेत.
हुतात्मा स्मारकाच्या परिसरातील गवत काढण्यात आले आहे. परिसरातील कचराही साफ करण्यात आला आहे, यामुळे येथे भेट देणाºया इतिहासप्रेमींनीही समाधान व्यक्त केले आहे. अशाचप्रकारे स्वच्छता नेहमी ठेवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या ठिकाणी उद्यान विकसित करावे व स्मारक परिसरातील इमारतीचाही योग्य वापर करावा, अशी मागणी केली आहे.