भिवंडी : तालुक्यात मोठ्या संख्येने सुरू असलेल्या गोदामांत शौचालयांची सुविधा नसल्याने गोदाम कामगारांचे व बाहेरून येणाऱ्या वाहनचालकांचे हाल सुरू असून गोदाम परिसरात होणाऱ्या घाणीकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.शासनाकडून स्वच्छतेचे धडे दिले जात असताना सरकारी कार्यालयांतून केवळ घराघरांत शौचालये बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. तसेच ग्रामपंचायतींना गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे बक्षीसही दिले जाते. परंतु, हे बक्षीस देत असताना परिसरातील स्वच्छतेबाबत विचार केला जात नाही. तालुक्यातील अंजूरफाटा ते काल्हेर, माणकोली, खारबाव तसेच नाशिक रोड आदी ठिकाणी हजारोंच्या संख्येने गोदामे सुरू आहेत. तसेच नवीन गोदामांची बांधकामेदेखील चालू आहेत. या गोदामांत लाखोंच्या संख्येने पुरुष व स्त्री कामगार काम करीत आहेत. या कामगारांसाठी अनेक गोदामधारकांनी व चालकांनी शौचालये बांधलेली नाहीत. त्यामुळे त्यांना परिसरातील शेतात अथवा आडोशाचा आधार घेऊन नैसर्गिक विधी उरकावे लागत आहेत. गोदामातील मालाची ने-आण करण्याकरिता स्थानिक व तालुक्याबाहेरील हजारो ट्रक, टेम्पो गोदाम परिसरात येत असतात. त्यांना नैसर्गिक विधी उरकण्याची सोय नसल्याने तेदेखील परिसरात घाण करतात. अशा प्रकारे परिसरात होणाऱ्या अस्वच्छतेमुळे ग्रामीण भागात रोगराई पसरत आहे. त्याकडे स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असून ग्रामपंचायतीने गोदाम परिसरात स्वच्छतागृहे बांधण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी गोदाम कामगारांकडून जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)तालुक्यात वळ ग्रामपंचायत क्षेत्रातील गोदामामध्ये माल घेण्यास गेलेला ओमकारनाथ मेढीलाल वर्मा हा टेम्पोचालक ओम गुड््स कॅरिअर ग्लोब कॉम्प्लेक्सच्या मोकळ्या जागेत प्रातर्विधीसाठी गेला असता त्यास ३ अनोळखी लोकांनी ‘ये हमारी जमीन है’ म्हणत काठीने मारहाण केली. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात वर्मा याने तक्रार केली आहे.
गोदामपट्ट्यात स्वच्छतेची बोंब
By admin | Published: July 15, 2015 11:15 PM