मराठी संस्कृती प्रतिष्ठानची श्रमदानातून स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:01 AM2017-10-07T02:01:32+5:302017-10-07T02:01:47+5:30
श्रीवर्धनमधील मराठी संस्कृती प्रतिष्ठानने स्वच्छतेचा वसा लोकसहभागातून जोपासला असून, समाजोपयोगी विविध उपक्रम प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून राबवत आहे.
संतोष सापते
श्रीवर्धन : श्रीवर्धनमधील मराठी संस्कृती प्रतिष्ठानने स्वच्छतेचा वसा लोकसहभागातून जोपासला असून, समाजोपयोगी विविध उपक्रम प्रतिष्ठान अनेक वर्षांपासून राबवत आहे.
प्रतिष्ठानची स्थापना ९ मार्च २०११ मध्ये प्रशांत शिंदे यांनी केली असून, सध्या १५० सदस्य कार्यरत आहेत. स्वच्छतेला प्रतिष्ठान अग्रक्रम देत असून, सणासुदीला प्रत्येक मंदिर प्रतिष्ठानचे सभासद झाडून पुसून स्वच्छ करतात. गणेशोत्सवात दीड दिवस, पाच दिवस व अकरा दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर गणेशमूर्तींचे पुनश्च विसर्जन केले जाते.
श्रीवर्धन नगरपालिकेने राबविलेल्या विविध स्वच्छता मोहिमेत प्रतिष्ठानचे सभासद हिरिरीने भाग घेऊन स्वच्छ व निरोगी श्रीवर्धन ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. सेवा, संस्कार व सुरक्षितता या ब्रीदवाक्यानुसार मराठी प्रतिष्ठान श्रीवर्धनमध्ये कार्यरत आहे. श्रीवर्धनमधील तरुणाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करत आहे. श्रीवर्धन एसटी स्टॅण्ड, शिवाजी चौक, सार्वजनिक कार्यालय, श्रीवर्धनचा विस्तीर्ण समुद्रकिनारा व स्मशानभूमी स्वच्छ ठेवण्यासाठी मराठी प्रतिष्ठान नेहमीच प्रयत्नशील असते.
शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यानंतर रायगड किल्ल्याच्या स्वच्छतेत मराठी प्रतिष्ठान महत्त्वाची भूमिका बजावते. श्रीवर्धन शहरात पर्जन्यमान जास्त असल्याने विविध पाखड्यामध्ये पाणी तुंबते. त्या वेळी नगरपालिका व प्रतिष्ठानचे सभासद स्वच्छतेचा प्रश्नांसाठी सर्वत्र जोमाने कार्य करतात. श्रीवर्धन गावातील कुसमा देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी असणाºया रस्त्यांची दुरु स्ती प्रतिष्ठानने पावसाळ्यात श्रमदान करून केली. सोमजाई माता ही श्रीवर्धनची ग्रामदेवता आहे. त्या मंदिराची साफसफाई, वाढलेले गवत व मोकाट जनावरांनी केलेली घाण प्रतिष्ठान वेळोवेळी साफ करतात.
श्रीवर्धन समुद्रकिनाºयावर असलेल्या स्मशानभूमीकडे नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. त्या वेळी प्रतिष्ठानने सभासदांकडून किनाºयावरील स्मशानभूमीची स्वच्छता केली. मराठी प्रतिष्ठान स्वच्छतेसोबत संस्कृती संवर्धनाचे कार्य अतिशय उत्तमरीत्या पार पाडत आहे. गुढीपाडव्याला सभासद पारंपरिक वेशभूषा करून ग्रामदेवता सोमजाई माता मंदिरापासून संपूर्ण श्रीवर्धन शहरात प्रभात फेरी काढतात. त्या वेळी संस्कृती रक्षण, स्वच्छतेविषयी जनजागृती, प्रदूषण नियंत्रण, पर्यावरणाबाबत मार्गदर्शन करण्यात येते.