स्वच्छतेचे पहिले प्रदर्शन केंद्र नवी मुंबईत, महापालिकेचा निर्णय, डंपिंग ग्राउंडच्या भूमीतून स्वच्छतेची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 03:50 AM2017-12-12T03:50:47+5:302017-12-12T03:50:57+5:30
कचरा हा देशातील सर्व महानगरांना भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे. स्वच्छता अभियानामध्ये देशात आघाडी घेतलेल्या नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेची माहिती देणारे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
- नामदेव मोरे
नवी मुंबई : कचरा हा देशातील सर्व महानगरांना भेडसावणारा ज्वलंत प्रश्न आहे. स्वच्छता अभियानामध्ये देशात आघाडी घेतलेल्या नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेची माहिती देणारे प्रदर्शन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या डंपिंग ग्राउंडवरील निसर्ग उद्यानामध्ये देशातील पहिले केंद्र उभे राहणार असून, हा प्रकल्प स्वच्छतेच्या चळवळीमध्ये आदर्श ठरणार आहे.
नवी मुंबई महापालिकेला २०१६ - १७ वर्षाच्या स्वच्छता सर्वेक्षणामध्ये देशात ८ वा व राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. महापालिकेने शहरात ६०० पेक्षा जास्त सार्वजनिक प्रसाधनगृहे उभारली आहेत. कचºयाची विल्हेवाट लावण्यासाठी देशातील आदर्श क्षेपणभूमी उभारली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. या सर्व कामांमुळे स्वच्छ शहरामध्ये नवी मुंबईची निवड झाली होती. स्वच्छता सर्वेक्षण २०१८ साठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांनी स्वत: प्रत्येक उपक्रमाची पाहणी करण्यास सुरवात केली आहे. याचाच भाग म्हणून नुकतीच कोपरखैरणेमधील निसर्ग उद्यानाला भेट दिली. शहरातील पहिले डंपिंग ग्राउंड येथे सुरू केले होते. त्याची क्षमता संपल्यानंतर महापालिकेने शास्त्रोक्त पद्धतीने क्षेपणभूमी बंद केली आहे. या ठिकाणी निसर्ग उद्यान विकसित केले आहे. याच ठिकाणी स्वच्छतेविषयी माहिती देणारे देशातील पहिले प्रदर्शन केंद्र सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी प्रशासनाला दिल्या आहेत. देशातील सर्वच शहरांमध्ये कचºयाची समस्या गंभीर होवू लागली आहे. कचºयाचा भस्मासुर, त्याचे गांभीर्य त्याचे दुष्परिणाम याची माहिती या प्रदर्शनातून देण्यात येणार आहे.
ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे फायदे, कचरा वर्गीकरण व त्यावर प्रक्रिया करणे का आवश्यक आहे. शहर स्वच्छतेमध्ये महापालिका प्रशासनाची भूमिका काय, नागरिकांची जबाबदारी काय, स्वच्छतेच्या चळवळीमध्ये कशाप्रकारे सहभागी होता येईल याविषयी माहिती या प्रदर्शनामधून देण्यात येणार आहे. ओला व सुका कचरा म्हणजे नक्की काय. प्रदूषणाचे प्रकार, प्लास्टिकचा भस्मासुर, ई-कचरा व त्याचे दुष्परिणाम याविषयीची माहिती या प्रदर्शनामधून देण्यात येणार आहे. कचºयातून घराच्या आवारामध्ये खतनिर्मिती कशी करावी याविषयीची माहिती देणारा छोटासा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. स्वच्छतेविषयीची माहिती चित्र व ध्वनिफितीद्वारे नागरिकांना देण्यात येणार आहे. कचºयाचे व्यवस्थापन कसे करावे हा सर्वच महापालिकांपुढे प्रश्न आहे. परंतु नवी मुंबई महापालिका कचºयाचे वर्गीकरण करून त्याविषयी जनजागृती करण्यासाठी कायमस्वरूपी प्रदर्शन उभे करणार आहे. हा प्रकल्प देशातील सर्वच महानगरांसाठी आदर्श ठरणार असून नागरिक, विद्यार्थी व सर्वांसाठी कचºयाची समस्या, त्यावरील उपाय याविषयी माहिती मिळणार आहे.
काय असणार आहे प्रदर्शनामध्ये ?
- जगाला भेडसावणाºया कचºयाच्या समस्यांची माहिती
- ओला व सुका कचरा म्हणजे काय त्याची माहिती
- कचरा वर्गीकरण व कचºयावरील प्रक्रियेची माहिती
- प्लास्टिक, ई-कचरा व इतर कचºयांविषयी माहिती
- कचºयावर घरात व सोसायटी आवारातील खतनिर्मितीची माहिती
- खतनिर्मितीच्या प्रकल्पाचे मॉडेल
- चित्र व ध्वनिफितीद्वारे माहिती देण्याची सुविधा
डंपिंग ग्राउंडचे माहिती केंद्र
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह देशातील बहुतांश सर्व शहरांमध्ये कचºयाची समस्या गंभीर आहे. कचरा टाकण्याची क्षमता संपल्यानंतरही क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद केली जात नाही. परंतु नवी मुंबई महापालिकेने कोपरखैरणे क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद केलीच याशिवाय तेथे निसर्ग उद्यान उभारले. त्याच ठिकाणी आता स्वच्छतेची माहिती देणारे प्रदर्शन उभे राहणार आहे.
नवी मुंबई स्वच्छ सुंदर व्हावी यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून कोपरखैरणेमधील निसर्गोद्यानामध्ये स्वच्छतेविषयी प्रदर्शन केंद्र सुरू करणे प्रस्तावित आहे. यामध्ये कचºयाची समस्या व उपाय याविषयी सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल.
- डॉ. रामास्वामी एन.,
आयुक्त महापालिका