नवी मुंबई विमानतळाच्या धाकले आयआर्लंडवरील रडारचा मार्ग मोकळा! केंद्राने दिली परवानगी

By नारायण जाधव | Published: February 19, 2024 08:18 PM2024-02-19T20:18:31+5:302024-02-19T20:18:51+5:30

सिडकोसह विकासक कंपनीला दिलासा

Clear the way for radar on Dhakale Island of Navi Mumbai Airport CRZ followed by permission granted by the Centre | नवी मुंबई विमानतळाच्या धाकले आयआर्लंडवरील रडारचा मार्ग मोकळा! केंद्राने दिली परवानगी

नवी मुंबई विमानतळाच्या धाकले आयआर्लंडवरील रडारचा मार्ग मोकळा! केंद्राने दिली परवानगी

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर मार्च २०२५ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्यादृष्टीने या विमानतळावर ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी अत्यावश्यक असलेली बेलापूर शहाबाज जवळील पनवेल खाडीतील धाकले आयडर्लंडवर निरीक्षण रडार यंत्रणा बसविण्यास आता केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयानेही अटी व शर्तींवर परवागनी दिली आहे.

यानुसार यात बाधित होणाऱ्या खारफुटीचे नुकसान कमी करण्यासाठी रडार यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेला पुलांच्या स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये दोन खांबांचे अंतर २० मीटरवरून ३० मीटरपर्यंत वाढविण्याची सूचना केंद्राने केली आहे. तसेच विजेच्या बचतीसाठी रडार प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोलार पॅनल बसविण्यात येणार आहेत.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या देखरेखीखाली ही कामे केली जाणार आहेत. प्राधिकरणाच्या अंदाजानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे प्रवासी प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज आहे. त्यानुसार विमानांचे किमान ३ नॉटिकल मैलावर उच्च तीव्रतेच्या धावपट्टीच्या ऑपरेशनसाठी रडार यंत्रणा बसविण्याची योजना आहे. यासाठी प्राधिकरणाने विमानांच्या चोख संचालनासाठी किमान ३ ठिकाणी विमानतळ सर्वेक्षण रडार प्रणाली बसविण्यासाठी योजना आखली आहे.

बिल्डरांसाठी धाकले आयर्लंडची निवड

सिडकोनेे पूर्वी एनआरआय कॉम्प्लेक्स मागील जागेची निवड केली होती. मात्र, यामुळे परिसरातील इमारतींच्या उंचीवर बंधने होती. यामुळे बिल्डरांच्या अंदाजे तीन हजार कोटींचे प्रकल्प अडचणीत आले होते. यामुळे त्यांच्या संघटनेने सिडकाेकडे रडारची जागा इतरत्र स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. तसेच सिडकोची १७० हेक्टर विक्रीयोग्य जमीन धोक्यात येणार होती. हे टाळण्यासाठी अखेर सिडकोने धाकले आयर्लंडची निवड केली आहे.

वाहतुकीसाठी सोयीची जागा

धाकले आयर्लंड हे आयर्लंड पनवेल खाडीने वेढलेले आहे. बेलापूरची महागाव जेट्टी आणि सीवूड टर्मिनल येथून जवळच असून, येथून सहज ये-जा करता येणार आहे. परिसरात कोणतीही मानवी वस्ती आणि विकासकामे सुरू नाहीत. रडार यंत्रणा बसविण्यासाठी ०.५३१५ हेक्टर खारफुटीसह ६० झाडांची कत्तल करावी लागणार आहे.

ही कामे करणार

रडारसाठी लागणारी जागा - ५० बाय ५० मीटर अर्थात ०.५० हेक्टर
जेट्टी - ४५ मीटर बाय १५ मीटर
जेट्टीला जोडणारा रस्ता - १२१ मीटर बाय ८ मीटर
जेट्टीचा अंतर्गत रस्ता : २७ बाय आठ मीटर
याशिवाय मलाबार शिपयार्डपर्यंत हे आयर्लंड रस्त्याने जोडण्यात येणार आहे.

माथेरानच्या डाेंगरात बसविणार रडार

विमानतळासाठी तीन रडार यंत्रणा बसवाव्या लागणार आहेत. यात एक यंत्रणा माथेरानच्या टेकड्यांमध्ये उभारण्यात येणार आहे. यासाठी सिडको आणि एएएआयने आतापर्यंत ११ ठिकाणांची पाहणी केली आहे. घनदाट जंगलातील दुर्गम टेकड्यांपैकी तीन ठिकाणे आतापर्यंत निश्चित केली आहेत, तर एक ठिकाण पोलिस वायरलेस कम्युनिकेशन इमारतीला लागून असून, या जागांच्या भूसंपादनासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Clear the way for radar on Dhakale Island of Navi Mumbai Airport CRZ followed by permission granted by the Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.