हिवाळ्यामुळे ग्राहकांची बाजरीला पसंती; मुंबईत प्रतिदिन ५० ते ९० टन विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 11:32 PM2020-01-13T23:32:20+5:302020-01-14T06:26:48+5:30
घरासह हॉटेलमध्येही बाजरीच्या वस्तूंना मागणी वाढली
नामदेव मोरे
नवी मुंबई : हिवाळा सुरू होताच मुंबई बाजार समितीमध्ये बाजरीची आवक जवळपास दुप्पट होऊ लागली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रतिदिन ५० ते ९० टन विक्री होत आहे. घरासह हॉटेलमधूनही बाजरीच्या वस्तूंना ग्राहकांकडून पसंती मिळू लागली आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील नागरिकांमध्ये आरोग्यविषयी जागृती वाढू लागली आहे. यामुळे वातावरणातील बदलाप्रमाणे आहारामध्येही बदल केला जात आहे. हिवाळा सुरू झाल्यापासून बाजरीच्या मागणीमध्ये वाढ होऊ लागली आहे. सप्टेंबरमध्ये मुंबई बाजार समितीमध्ये सरासरी ३० ते ४० टन बाजरीची आवक होऊ लागली होती. सद्यस्थितीमध्ये ही आवक वाढून ५० ते ९० टन एवढी झाली आहे. बलवर्धक धान्य म्हणून याची ओळख असून त्यामध्ये तंतुमय पदार्थ, आयर्न, मॅग्नेशीयम, कॉपर, व्हिटॅमीन ईचे प्रमाण जास्त असते. यामुळे हिवाळ्यात बाजरीच्या वस्तूंना पसंती दिली जाते. सद्यस्थितीमध्ये घरांमध्ये व हॉटेलमध्येही बाजरीच्या भाकरीची मागणी वाढली आहे. याशिवाय थालीपीठ, वडी व इतर वस्तूही केल्या जात आहेत.
देशात सर्वाधिक बाजरीचे उत्पादन राजस्थान, उत्तरप्रदेश, गुजरात, हरयाणा, मध्यप्रदेश व महाराष्ट्रामध्ये होत आहे. देशभरातून बाजरी विक्रीसाठी मुंबई बाजार समितीमध्ये येत आहे. राज्यातील सर्वात जास्त विक्री मुंबईमध्येच होत असून त्यानंतर जालना व इतर बाजार समित्यांमध्येहीआवक वाढू लागली आहे. गतवर्षी घाऊक बाजारपेठेमध्ये १८ ते २६ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत होती. यावर्षी बाजारभाव प्रतिकिलो २६ ते ३२ रुपये झाले असल्याची माहिती बाजार समितीमधील व्यापारी व अधिकाऱ्यांनी दिली. मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवरही मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
पुढील कारणांसाठी बाजरीला दिली जाते पसंती
बाजरी उष्णतावर्धक असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ऊर्जास्रोत ठरत आहे. बाजरीच्या पदार्थांमुळे खूप वेळेपर्यंत भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी बाजरीचा उपयोग होतो. यामध्ये मेग्नॅशीयम व पोटॅशीयम असल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बाजरीमध्ये फायबर्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते.