- वैभव गायकरपनवेल : पनवेल महापालिकेत समाविष्ट सिडको नोडमधील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. हस्तांतराच्या नावाखाली सिडकोने विविध कामांकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. त्यातच नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार पनवेल महापालिकेत समाविष्ट सिडको नोडमधील विविध वसाहतींमध्ये तब्बल २९९१ पथदिवे बंद असल्याची माहिती समोर आली आहे.पनवेल महापालिकेत समाविष्ट खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा वसाहत, तळोजे पाचनंद, कामोठे, आसूडगाव, पनवेल स्थानक रस्ता, आसुडगाव, काळुंद्रे, तक्का आदीचा यात समावेश आहे. पनवेल महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने ७ नोव्हेंबर २०१९ रोजी सिडको नोडमधील विविध विभागातील पथदिव्यांची संयुक्त पाहणी केल्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.विशेष म्हणजे, महापालिका क्षेत्रातील रहिवासी वारंवार सिडकोकडे तक्रारी करीत आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. महापालिकेने सर्व्हे केलेल्या काही ठिकाणी चोऱ्यांचे प्रकारही घडले आहेत. सिडको महामंडळाच्या वतीने विकासकामांवर कोट्यवधींचा निधी खर्च केला जात आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली सिडको वसाहतीमध्ये हजारो कोटींची विकासकामे सिडकोच्या मार्फत सुरू आहेत. पादचाऱ्यांना अंधारातूच मार्गक्रमण करावे लागत आहे, अशा वेळी एखाद्या वेळेला रात्री अपरात्री अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे पालिकेच्या उपायुक्तांनी सिडकोच्या मुख्य अभियंत्यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट नमूद केले आहे.पालिकेच्या स्थापनेपासून सिडको वसाहतीमधील विविध विकासकामे असो वा पालिकेने हाती घेतलेल्या कामासंबंधी ना हरकत दाखला असो, सिडकोमार्फत पालिकेची अडवणूक केली जात आहे.पनवेल पालिकेतील नगरसेवकांनी सिडको वसाहतीत नगरसेवक निधीतून हाती घेतलेल्या कामांना सिडको ना हरकत दाखला देत नसल्याने अनेक कामे प्रलंबित आहेत. सिडको कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेण्याचे काम करीत असल्याचा आरोप नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणी सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातंबे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रतिसाद मिळाला नाही.सिडको नोडमधील अनेक पथदिवे बंद आहेत. पनवेल महापालिकेने केलेल्या सर्व्हेनुुसार, विभागनिहाय आकडेवारीची माहिती सिडकोच्या विद्युत विभागाला पत्राद्वारे दिली आहे.- डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका
सिडको वसाहतींतील २९९१ पथदिवे बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:45 AM