नवी मुंबई: राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवल्यानंतर आता महाविकास आघाडीनं नवी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीनं नवी मुंबईतले भाजपाचे दिग्गज नेते गणेश नाईक यांना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. नाईक यांचे खंदे समर्थक मानले जाणारे सुरेश कुलकर्णी ४ नगरसेवकांसह शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे. एप्रिलमध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. त्याआधी गणेश नाईक यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीनं जोर लावला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईत तळ ठोकला आहे. गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतल्या वर्चस्वाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीनं भाजपा नगरसेवकांकडे मोर्चा वळवला आहे. नाईक यांचे विश्वासू समजले जाणारे सुरेश कुलकर्णी ४ नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करू शकतात. कुलकर्णी यांनी तीनवेळा स्थायी समितीचं सभापतीपद भूषवलं आहे.उद्या तुर्भे भागात सुरेश कुलकर्णी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा उपस्थित राहणार आहेत. कुलकर्णी यांचं तुर्भे परिसरात वर्चस्व आहे. या भागातून ८-९ नगरसेवक निवडून येतात. त्यामुळे कुलकर्णी यांच्या पक्ष प्रवेशामुळे या भागात शिवसेनेला बळ मिळू शकतं. महाविकास आघाडी झाल्यानंतरची पहिलीच महापालिका निवडणूक असल्यानं शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
भाजपाला दे धक्का; गणेश नाईकांचा खास माणूस ४ नगरसेवकांसह शिवसेनेच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 9:40 PM