वापराविना दोन्ही विद्युत शवदाहिन्या बंद; नागरिकांमध्ये जनजागृतीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 11:39 PM2019-09-13T23:39:50+5:302019-09-13T23:40:03+5:30
दोन्ही दाहिन्या सुरू करण्याची मागणी
नवी मुंबई : पालिकेच्या वतीने करावे व तुर्भे येथे सुरू करण्यात आलेल्या विद्युत शवदाहिन्या वापराविना बंद पडल्या आहेत. परिणामी एनआरआय येथील एका कुटुंबाला त्यांच्या मयत व्यक्तीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी पनवेलमधील विद्युत दाहिनीचा वापर करावा लागला. या प्रकारावरून नागरिकांमध्ये जनजागृती करून दोन्ही शवदाहिन्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
मयत व्यक्तींचे मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमीत वापरल्या जाणाऱ्या लाकडांपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेच्या वतीने करावे व तुर्भे येथे दोन विद्युत शवदाहिनी सुरु करण्यात आल्या होत्या. मात्र विद्युत शवदाहिनीत मृतदेह जाळण्याबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. त्यामुळे मयत व्यक्तींच्या नातेवाइकांकडून विद्युत शवदाहिनीकडे पाठ फिरवली जात आहे. परिणामी दोन्ही विद्युत शवदाहिन्या चार वर्षांपासून वापराविना पडून आहेत. दरम्यानच्या काळात त्या डिझेलऐवजी गॅसवर चालतील असा बदल देखील करण्यात आलेला आहे. मात्र नियमित वापर होत नसल्याने त्या नादुरुस्त स्थितीत आहेत. अशातच सोमवारी एनआरआय येथील एका व्यक्तीचे आकस्मिक निधन झाले. त्यांनी आपल्या मृतदेहावर विद्युत दाहिनीमध्येचे अंत्यसंस्कार व्हावेत अशी अंतिम इच्छा व्यक्त केलेली होती. यामुळे त्यांच्या नातेवाइकांनी प्रथम करावे व नंतर तुर्भेतील विद्युत शवदाहिनीबाबत चौकशी केली. यावेळी दोन्ही ठिकाणी अंत्यसंस्कार बंद असल्याचे समजताच त्यांना पर्यायी पनवेलमधील विद्युत शवदाहिनीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. याकरिता मयत व्यक्तीच्या नातेवाइकांची ससेहोलपट झाल्याचा संताप सामाजिक कार्यकर्ते सचिन शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी पालिकेला निवेदन देवून दोन्ही विद्युत शवदाहिन्या तात्काळ सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच नागरिकांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्याचीही मोहीम पालिकेच्या वतीने हाती घेतली जाण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली आहे.