खारघर-तळोजा पूल वाहतुकीस बंद, सिडकोचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 04:26 AM2019-03-24T04:26:48+5:302019-03-24T04:26:58+5:30
खारघर शहर व तळोजा गावाला जोडणारा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने सिडकोने पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
पनवेल : खारघर शहर व तळोजा गावाला जोडणारा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याने सिडकोने पुलावरून वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुलाला लागून असलेल्या सिडकोच्या बागेश्री गृहप्रकल्पाच्या उभारणीसाठी सिडको याच धोकादायक पुलाचा वापर करीत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर सिडकोला जाग आल्याने धोकादायक पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे फलकही या ठिकाणी लावले आहेत.
दोन वर्षांपासून हा पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे फलक सिडकोने या ठिकाणी लावले आहेत. मात्र, या सूचनेचे उल्लंघन सिडकोच करीत असल्याचे निदर्शनास आले. एकीकडे धोकादायक पुलांच्या वापरामुळे अपघात होत असल्याच्या घटना वारंवार घडत असतानादेखील सिडको याकडे गांभीर्याने पाहत नव्हती. काही दिवसांपूर्वी मुंबईतील पादचारी पूल कोसळल्याने सहा जणांना जीव गमवावा लागल्याची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर सिडकोने पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा प्रकारचे बॅरिकेड्स या ठिकाणी लावले आहेत.
या रस्त्यावरून वाहतूक न करता, पापडीचा पाडा या ठिकाणाहून पर्यायी मार्गाचा वापर करावा, अशी सूचना सिडकोमार्फत करण्यात आली आहे. हा पूल धोकादायक असल्याने नव्याने बांधण्याची गरज आहे.
धोकादायक पुलावरून वाहतूक सुरूच
धोकादायक पुलावरून वाहतूक न करता पर्यायी मार्ग असलेल्या पापडीचा पाडा या मार्गावरून वाहतूक करण्याच्या सूचना सिडकोकडून करण्यात आल्या आहेत; मात्र तरीदेखील काही वाहनचालक याच पुलावरून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.