कोपरा पूल वाहतुकीस बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 11:41 PM2019-04-06T23:41:25+5:302019-04-06T23:41:42+5:30
सिडकोचा निर्णय : प्रवेशद्वाराजवळ लावले पत्रे
पनवेल : सिडकोने अनेक वर्षांपासून धोकादायक घोषित केलेला कोपरा पूल गुरुवारपासून वाहतुकीस बंद केला आहे. या संदर्भात ‘लोकमत’मध्ये सोमवार, १ एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत सिडकोने कोपरा पूल वाहतुकीस बंद केला आहे. लवकरच या ठिकाणी नव्याने पर्यायी पूल उभारला जाणार आहे.
पाच वर्षांपूर्वी सिडकोने हे पूल धोकादायक असल्याचे घोषित करत केवळ पादचाऱ्यांसाठी हे पूल वापरात येणार असल्याचे फलक ठळकपणे या ठिकाणी लावले होते. मात्र, तरीदेखील धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू होती. काही दिवसांपूर्वी सीएसएमटी येथील पादचारी पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना झाली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सिडको प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज होती. आयआयटीमार्फत पुलाचे सर्वेक्षण करून या ठिकाणी सिडको नवीन पूल उभारणार आहे. सिडकोने पुलावरून वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती पत्राद्वारे वाहतूक पोलिसांना दिली आहे.
कोपरा पुलाच्या प्रवेशद्वाराजवळ पत्रे लावून हा पूल पूर्णपणे वाहतुकीस बंद केला आहे. अशाच प्रकारे सेक्टर ४० मधील खारघर तळोजा गावाला जोडणाऱ्या धोकादायक पुलाची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर हा पूलदेखील वाहतुकीस बंद केला आहे.
कोपरा पूल धोकादायक असल्याने वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय सिडको मार्फत घेण्यात आला आहे. या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येणार आहे. सिडकोच्या परिवहन विभागाकडे तशा प्रकारचा अहवाल पाठविण्यात आला आहे. लवकरच या ठिकाणी पर्यायी पूल उभारण्यात येईल.
- संजय पुदाळे, सिडको अधिकारी, खारघर नोड