एमआयडीसी मुख्यालयासमोर मलनि:सारण वाहिनी बंद
By Admin | Published: November 18, 2016 04:06 AM2016-11-18T04:06:46+5:302016-11-18T04:06:46+5:30
एमआयडीसी मुख्यालय ते लोकमत प्रेस दरम्यानची मलनि:सारण वाहिनी रस्ता रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने तोडली आहे.
नवी मुंबई : एमआयडीसी मुख्यालय ते लोकमत प्रेस दरम्यानची मलनि:सारण वाहिनी रस्ता रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने तोडली आहे. जवळपास एक वर्षापासून कंपन्यांमधील सांडपाणी जाण्यासाठी वाहिनीच उपलब्ध नाही. एमएमआरडीएच्या ठेकेदाराने काम अर्धवट सोडले असून, त्याचा त्रास येतील नागरिकांना होत असताना एमआयडीसी व महापालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.
एमआयडीसीच्या समोरील रोड व उड्डाणपुलाचे बांधकाम एमएमआरडीएने केले आहे. एक वर्षापूर्वीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथील पुलाचे उद्घाटन केले आहे. पण उद्घाटनानंतरही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. लोकमत प्रेस ते हनुमान नगर दरम्यानचे गटार तोडून ठेवले आहे. गटारातील पाणी रोडवर येवू लागले आहे. एमआयडीसी मुख्यालय, बाजूचा भूखंड ए ८१८, हनुमान नगर व एमआयडीसीच्या मधील कंपनी या सर्वांचे सांडपाणी जाण्यासाठीची वाहिनी तुटली आहे. त्या वाहिनीची दुरूस्ती केलेली नसून कंपन्यांची वाहिन्यांची जोडणी केलेली नाही. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. शिवाय एमआयडीसीच्या आवारामध्ये साचलेल्या पाण्यामुळे बाजूच्या ए ८१८ वरील कंपनीची संरक्षण भिंत खचली आहे. खड्डे व रखडलेल्या रूंदीकरणामुळे वाहतूक कोंडी होत असून रोज एक तरी अपघात होत आहे.
या ठिकाणी रस्ता, गटार, मलनि:सारण वाहिनी व इतर अनेक कामे अर्धवट राहिलेली आहेत. रस्ता बांधणाऱ्या ठेकेदाराने डेब्रिजही उचलले नाही. येथील स्थिती अत्यंत गंभीर झाली असून त्याकडे सर्वच यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. एमएमआरडीएचे अधिकारी ठेकेदारावर कारवाई करत नाहीत. महापालिका व एमआयडीसीचे अधिकारी आमची जबाबदारी नसल्याचे कारण देवून या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे याविषयी राज्य शासनाकडे तक्रार करण्याची तयारी नागरिकांनी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)