नवी मुंबई : सायन - पनवेल मार्गावरील सानपाडा येथील पादचारी पूल वापरासाठी बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्ताने त्यावरून पादचाऱ्यांना प्रवास न करण्याच्या सूचना त्याठिकाणी फलकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
सायन-पनवेल मार्गावर रस्ता ओलांडण्याचे प्रकार घडू नयेत याकरिता आवश्यक ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. त्यानुसार सानपाडा व तुर्भे विभागाला जोडणारा पादचारी पूल नागरिकांना उपयुक्त ठरत आहे. त्यावरून दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा सुरू असते. मात्र मागील तीन दिवसांपासून हा पूल नागरिकांच्या वापरासाठी बंद केला आहे. तशा प्रकारच्या सूचना पुलाच्या दोन्ही बाजूस लावण्यात आल्या आहेत. सदर पुलाचे दुरुस्ती काम करण्याच्या निमित्ताने त्यावरून प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र त्याठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याने पुलावरून प्रवास करण्यास बंदी असतानाही नागरिकांकडून त्याचा वापर सुरूच आहे. तर नेमकी कोणत्या प्रकारची दुरुस्ती त्याठिकाणी केली जाणार आहे, यासंबंधीची कसलीही माहिती फलकावर देण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमात आहे.