नैना क्षेत्रातील बंद गृहप्रकल्प पुन्हा झाला सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:28 AM2019-09-22T00:28:48+5:302019-09-22T00:28:51+5:30
ग्राहक न्यायालयाचा दणका; १४१ ग्राहकांना दिलासा; सहा महिन्यांत देणार घरांचा ताबा
- वैभव गायकर
पनवेल : नैना क्षेत्रातील पनवेल तालुक्यात मागील सात वर्षांपासून बंद पडलेल्या गृहप्रकल्पाचे काम नव्याने सुरू करून नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना सहा महिन्यांत घरे देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्राहक न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार संबंधित विकासकाने शुक्रवारी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून बंद पडलेल्या गृहप्रकल्पाचे काम नव्याने सुरू केले आहे. त्यामुळे या प्रकल्पात घरासाठी नोंदणी केलेल्या १४१ ग्राहकांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पनवेल तालुक्यातील विहिघर, नेरे पाडा या गावांत हिंदुस्थान होम्स या विकासक कंपनीचे मालक चुनीलाल किशोरीलाल गुप्ता यांनी २0१२ मध्ये गृहप्रकल्पांची घोषणा केली. ग्राहकांकडून नोंदणीसाठी कोट्यवधी रुपये घेण्यात आले.परंतु नैनाच्या जाचक अटी, परवानग्यासाठी लागणारा विलंब तसेच अन्य विविध कारणांस्तव हिंदुस्थात कंपनीचे दोन्ही गृहप्रकल्प मध्येच बंद पडले. त्यामुळे शेकडो ग्राहकांचे कोट्यवधी रुपये बिल्डरकडे अडकून पडले. घरही नाही आणि पैसेही परत मिळत नसल्याने ग्राहकांनी अखेर १४ मार्च २0१६ रोजी ग्राहकांनी बिल्डरच्या विरोधात रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली. मे २0१६ मध्ये न्यायालयाने संबंधित बिल्डरकडून ग्राहकांचे पैसे वसूल करून देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने विहिघर आणि नेरे येथील ६२ आणि २0 गुंठे जमिनीचा लिलाव करण्यात आला. या लिलावातून १ कोटी ६८ लाख रुपये प्राप्त झाले. या रकमेचे काही ग्राहकांना वाटप करण्यात आले. त्यामुळे उर्वरित ग्राहकांनी या लिलाव प्रक्रियेच्या विरोधात राज्य आयोग ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाद मागितली. ग्राहकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर ग्राहक मंचाने या लिलाव प्रक्रियेला स्थगिती दिली. या प्रकल्पात शेकडो ग्राहकांची फसवणूक झाली असताना लिलावातील रकमेतून जर केवळ १५ ग्राहकांनाच पैसे मिळणार असतील, तर उर्वरित ग्राहकांचे काय, असा सवाल यावेळी तक्रारदारांकडून उपस्थित करण्यात आला. विकासक गुप्ता यांनी देखील ग्राहकांची बाजू घेत लिलाव रद्द केल्यास मी ग्राहकांना घरे बांधून देण्यास तयार असल्याचे मत न्यायालयापुढे मांडले. न्यायालयाने ग्राहकांचे हित लक्षात घेता पुढील सहा महिन्यात फसवणूक झालेल्या सर्व ग्राहकांना घरे बांधून देईल या बोलीवर न्यायालयाने जिल्हा ग्राहक मंचाने केलेला लिलाव रद्द करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात ग्राहकांचे वकील म्हणून अॅड. प्रणाली पाटील आणि अॅड. मनोज गाढवे यांनी काम पाहिले.
दरम्यान, हा प्रकल्प नव्याने सुरु होणार असल्याने ग्राहकांनी एकत्रित येऊन बांधकाम व्यावसायिकांना शुभेच्छा दिल्या. सात वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागत असल्याने अनेकांना आपले अश्रू अनावर झाले.
आम्हाला कोणत्याही ग्राहकाची फसवणूक करायची नव्हती म्हणूनच आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रियेला सामोरे गेलो. अखेर ग्राहकांसह आम्हाला देखील न्याय मिळाल्याने वेळेत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- चुनीलाल गुप्ता,
बांधकाम व्यावसायिक
आयुष्यभराची पुंजी खर्ची घालून आम्ही घर खरेदीसाठी पैसे गुंतविले. काही कारणास्तव हा प्रकल्प रखडला. त्यावेळी आम्हाला पुन्हा घर मिळणार नाही असे वाटले होते. परंतु राज्य ग्राहक आयोगाच्या महत्त्वपूर्ण निर्णयाने आमचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.
- संदीप कोटकर,
ग्राहक