कळंबोली : एक्स्प्रेसवेवरील बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी लेझर तंत्रज्ञानयुक्त बंदुका, ई-चलन यंत्रणा, मद्यपींवरील कारवाईसाठी यंत्रणा यांसारखी आधुनिक तांत्रिक उपकरणे असलेले अत्याधुनिक वाहन महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाले आहे. या वाहनाच्या साहाय्याने दोन दिवसांत १०० च्या वर वाहनांवर कारवाई करण्यात आली. दंडात्मक कारवाई करणे सोईस्कर झाल्याचे या वेळी महामार्ग सहायक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी यांनी सांगितले.मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर चालकांकडून वाहतुकीचे नियम मोठ्या प्रमाणात मोडले जात असल्याने अपघातात भर पडत आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांना आळा घालण्याकरिता वाहतूक विभागाने कंबर कसली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अपघात तसेच नियम मोडणाºयावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशीच एक कार महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात आली आहे.या वाहनात स्पीड मीटर, पेंटर मीटर, अल्कोहोल तपासणी यंत्रणा, लाइट बार, डुम लाइट, लेन कटिंग, माइक सिस्टीम, कॅमेºयाद्वारे एका वेळी तीन वाहनांचे छायाचित्र काढण्यात येते. सोमवारपासून बोरघाट, पनवेल-पळस्पे या महामार्गावर लेन कटिंग, वाहन स्पीड, टू व्हीलर, अवजड वाहने अशा १०० पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:17 AM