शहरातील सर्व जुगार अड्डे बंद
By admin | Published: August 29, 2015 10:21 PM2015-08-29T22:21:00+5:302015-08-29T22:21:00+5:30
शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. चार महिन्यांमध्ये १२ जुगार अड्ड्यांसह ५० अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करून ४७१ आरोपींना गजाआड केले आहे.
नवी मुंबई : शहरातील अवैध व्यवसायांविरोधात पोलिसांनी मोहीम तीव्र केली आहे. चार महिन्यांमध्ये १२ जुगार अड्ड्यांसह ५० अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करून ४७१ आरोपींना गजाआड केले आहे.
नवी मुंबईमधील वाढत्या शहरीकरणाबरोबर येथील गुन्हेगारीमध्येही वाढ होवू लागली होती. शहरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू झाले होते. व्हिडीओ गेमच्या नावानेही जुगार सुरू होता. लॉटरी, मटक्यासह वेश्याव्यवसाय असे अनेक अवैध व्यवसाय शहरात सुरू होते. शहाजी उमाप यांनी परिमंडळ एकच्या उपआयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच शहरातील अवैध व्यवसाय तत्काळ बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यासाठी उपनिरीक्षक रोहन बागडे व कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांचे विशेष पथकही तयार करण्यात आले. पोलीस स्टेशन व विशेष पथकाने चार महिन्यांपासून शहरातील सर्व अवैध व्यवसायांवर धाडसत्र सुरू केले. आतापर्यंत तब्बल १२ जुगार अड्ड्यांवर धाड टाकून २८९ आरोपींना अटक केली आहे. काही ठिकाणी करमणुकीच्या नावाखाली जुगार सुरू होता. अशा ४ क्लबवरही कारवाई करण्यात आली. आयुक्तालयाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच सर्व जुगार अड्डे बंद झाले आहेत. जुगार अड्ड्यांनंतर बेकायदेशीर व्हिडीओ गेम पार्लरवर धाडसत्र सुरू करण्यात आले. ७ ठिकाणी धाड टाकून ४८ जणांवर कारवाई केली आहे.
पूर्वघोषित निकाल असणाऱ्या झटपट लॉटऱ्यांना बंदी असताना काही लॉटरीचालक तो व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. शहरात तीन ठिकाणी धाड टाकून ५ आरोपींना अटक केली. शहरातील १३ बारवर धाडी टाकून ६७ महिला व पुरुषांना अटक केली आहे. पिटा कायद्याअंतर्गतही दोन ठिकाणी कारवाई केली आहे.
संसार वाचविला
एपीएमसीमधील एका माथाडी कामगाराने जुगाराच्या व्यसनापायी दोन लाखपेक्षा जास्त कर्ज केले आहे. बहिणीने मुलाच्या लग्नासाठी दिलेली रक्कमही जुगार खेळण्यात खर्च केली. कर्ज वाढल्यामुळे माथाडीचा परवानाही विकण्याचा विचारात होता. परंतु जुगार अड्डे बंद केल्यामुळे आमचा उद्ध्वस्त होणारा संसार वाचल्याची प्रतिक्रिया या कामगाराच्या कुटुंबीयांनी दिली. कोपरखैरणेतील एक कामगार लेडीज बारमध्ये पैसे उधळून कर्जबाजारी झाला होता. परंतु पोलिसांनी अवैध व्यवसाय बंद केल्यामुळे त्यांच्या परिवारासही दिलासा मिळाला आहे.
विशेष पथकाचेही कौतुक : अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेतील कर्मचाऱ्यांनी चार महिन्यांत अवैध व्यवसाय करणाऱ्यांना तुरुंगात पाठविले आहे. या पथकात उपनिरीक्षक रोहन बागडे, विनोद भोईर, रामचंद्र पोळ, संतोष शिंदे, अमित डाकर, रोहन तांडेल, विशाल वाघ, अमोल भोसले, सचिन शेरमकर, विनोद चौधरी यांचा समावेश आहे.
शहरात कोणत्याही स्थितीमध्ये अवैध व्यवसाय चालू दिला जाणार नाही. सर्व जुगार अड्डे बंद केले आहेत. यापुढेही ते सुरू होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. शहरात कुठेही जुगार किंवा इतर अवैध व्यवसाय निदर्शनास आला तर नागरिकांनी तत्काळ माहिती द्यावी. संबंधितांवर तत्काळ कडक कारवाई करण्यात येईल.
- शहाजी उमाप, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ एक