विविध मागण्यांसाठी माथाडी कामगारांचा बंद; बाजार समितीमधील व्यवहार ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 01:36 AM2020-12-15T01:36:41+5:302020-12-15T06:46:38+5:30
शासनाने २४ डिसेंबरला आयोजित केली बैठक
नवी मुंबई : शासनाकडे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांनी सोमवारी लाक्षणिक बंदचे आयोजन केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले हाेेते. शासनाने २४ डिसेंबरला विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीमध्ये प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा आंदाेलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने बंदचे आयोजन केले हाेते. कामगारांचे अनेक प्रश्न १० ते १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. शासनाकडून प्रत्यक्षात प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त आश्वासने दिली जात असल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून १४ डिसेंबरला राज्यव्यापी बंदचे आवाहन केले होते. मुंबई बाजार समितीच्या कांदा, बटाटा, भाजी, फळ, मसाला व धान्य मार्केटमधील व्यवहार ठप्प होते. माथाडी भवनसमोर कामगारांचा मेळावा घेण्यात आला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन आयोजित केले हाेते. कोरोना काळात कामगारांना विमा संरक्षण देण्यात यावे. रेल्वेचा पास देण्यात यावा. माथाडी बोर्डावर पूर्णवेळ अध्यक्ष व सचिवांची नियुक्ती करण्यात यावी. रेल्वे यार्डात सुविधा मिळाव्या, बोर्डामध्ये माथाडी कामगारांच्या मुलांना नोकरी देण्यात यावी, अशी मागणी माथाडी नेेते नरेंद्र पाटील यांनी केली.
कामगारांच्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी २४ डिसेंबरला विशेष बैठकीचे आयोजन करण्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे. यामुळे बेमुदत बंद मागे घेण्यात आला आहे. बैठकीत प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. मुंबई व्यतिरिक्त नाशिक, कोल्हापूर, पुणे, सातारा परिसरातही कामगारांनी आंदोलन केले.
आवक आली जावक बंद
माथाडी कामगारांनी बंदचे आयोजन केल्यामुळे पाचही मार्केटचे व्यवहार बंद होते. कृषिमाल पाठविणाऱ्या काहींना बंदविषयी माहिती नसल्यामुळे त्यांनी माल विक्रीसाठी पाठविला होता. दिवसभरात पाच मार्केटमध्ये २०८ वाहनांची आवक झाली. परंतु मार्केटमधून किरकोळ मार्केटमध्ये माल गेला नाही.
शासनाकडे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी बंदचे आयोजन केले होते. राज्य सरकारने प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीमध्ये प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- नरेंद्र पाटील, माथाडी नेते