मराठी शाळा बंद पडणे म्हणजे संस्कृतीचा लचका तोडण्यासारखे, प्रवीण दवणे यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 12:35 PM2024-01-16T12:35:31+5:302024-01-16T12:35:41+5:30
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते.
नवी मुंबई : मराठी शाळा बंद पडणे म्हणजे संस्कृतीचा लचका तोडणे आहे. दोन पिढ्यांमधील तणाव वाढताना दिसतोय. कारण घराघरांमध्ये संवादाचे मातृभाषा हे माध्यम हरवत चालले आहे, अशी खंत साहित्यिक व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी दवणे म्हणाले की, नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ आहेच. मनाची स्वच्छता राखण्यासाठी मराठी भाषेचा, साहित्याचा, व्यापक प्रसार करण्यातही आघाडीवर असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
भाषा जीवनाला प्रवाही ठेवते. सर्वांना सामावून घेणाऱ्या मराठी भाषेची आधुनिक काळात बदलती संरचना स्वीकारली पाहिजे. आयुष्यात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बा.भ.बोरकर, इंदिरा संत, पु.ल. देशपांडे यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या अनुभवाचा खजिना खुला केला. संवर्धनातील ‘सं’ हा संगोपनाचा असून, संवेदनांचे सपाटीकरण होत असल्याच्या परिस्थितीत आपण आयुष्याचे उत्सव हरवून बसलोय, अशीही वास्तव स्थिती त्यांनी मांडली. कोणत्याही क्षेत्रात मोठे होण्याच्या मुळाशी घट्ट भाषाप्रेम असल्याचे सांगत त्यांनी बाहेरचे विश्व जवळ येताना आपल्या आतले विश्व हरवता कामा नये, त्यासाठी आपल्याला संस्कृतीशी जोडून ठेवणारी भाषा जोपासण्याचे आवाहन केले.
लेखन स्पर्धा
अधिकारी, कर्मचारी सहभागाकरिता वक्तृत्व, काव्यवाचन, तसेच चारोळी, घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.