मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी क्लृप्त्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 12:48 AM2019-04-18T00:48:54+5:302019-04-18T00:49:11+5:30
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यंदा निवडणूक विभागाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी यंदा निवडणूक विभागाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार दिव्यांगांना मतदानाविषयीचे प्रशिक्षण दिले जात असून, त्यांच्यासाठी वाहतुकीचीही व्यवस्था केली जाणार आहे. तर लहान मुलांच्या पालकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सोसायटीनिहाय पाळणाघर सुरू केले जाणार आहे.
२९ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच उमेदवारांनी कंबर कसली आहे. निवडणूक विभागही मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवताना दिसत आहे. दिव्यांगांसाठीही विशेष सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्याकरिता दृष्टिहीन, कर्णबधीर अथवा मूकबधीर यांच्यासह अपंगांचा शोध घेतला जात आहे. सद्यस्थितीला ऐरोली विधानसभा क्षेत्रात २८९ तर बेलापूर विधानसभा क्षेत्रात २३४ अपंग मतदार आहेत. त्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निवडणूक विभाग करत आहे. त्या अनुषंगाने बुधवारी ऐरोली येथील निवडणूक विभाग कार्यालयाच्या आवारात विकलांग मतदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला परिसरातील १०० हून अधिक व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निर्मला सूर्यवंशी-थिटे, पालिकेच्या सहायक आयुक्त संध्या अंबादे, निवडणूक विभागाचे अधीक्षक अरविंद उरसळ आदीनी मार्गदर्शन केले. उपस्थित अपंग व्यक्तींना मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व पटवून देण्यात आले, तसेच उर्वरित अपंग व्यक्तींपर्यंतही पोहोचून त्यांनाही मतदानासाठी प्रोत्साहित करण्यास निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे. तळमजल्याव्यतिरिक्त वरच्या मजल्यावर मतदान केंद्र असेल, अशा ठिकाणी वृद्ध अथवा अपंग व्यक्तींसाठी डोलीचीही व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे दृष्टिहीन व्यक्तींनाही मतदान करता यावे, याकरिता त्यांना वोटिंग मशिनवरील ब्रेल लिपीविषयी माहिती दिली जात आहे.