ढगाळ वातावरणाचा रानमेव्याला फटका?
By admin | Published: May 12, 2016 02:17 AM2016-05-12T02:17:48+5:302016-05-12T02:17:48+5:30
कोकणात सध्या रानमेव्याला मागणी असली तरी गेले काही दिवस विविध भागांत पडणारा अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे डोंगरची मैना रुसणार, असे चित्र निर्माण झाले आहे
दासगाव : कोकणात सध्या रानमेव्याला मागणी असली तरी गेले काही दिवस विविध भागांत पडणारा अवेळी पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे डोंगरची मैना रुसणार, असे चित्र निर्माण झाले आहे. करवंदांसारख्या विविध रानमेव्यांना याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावागावात डोंगर आणि जमिनी विकण्याकडे ग्रामीण भागात कल वाढल्याने धनदांडग्यांनी हे डोंगर बोडके करण्याचा सपाटा लावला आहे. या वनतोडीमुळे करवंदाची रोपटी नष्ट होत असल्याने भविष्यात या रानमेव्याला चाकरमान्यांनादेखील मुकावे लागणार अशी, स्थिती निर्माण होत आहे. याच रानमेव्यावर उन्हाळ्यात आदिवासींचा उदरनिर्वाह चालतो. हा रानमेवा आता डोंगरावर मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे.
कोकणात मे महिन्यात सुटीच्या कालावधीत नोकरी-धंद्यानिमित्ताने बाहेरगावी गेलेला चाकरमानी आपल्या गावात येतो. सुटीच्या काळात लहानापासून मोठ्यापर्यंत सारेच जण गावातील आंबे, रानातील करवंदे, काजूची बोंडे, आळू, जांभळे अशी विविध रानफळे खाण्यात गुंग होतात. आता रानमेव्याचा मोसम असून, रानात करवंद, जांभळे, आळू पिकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यात निर्माण होणारे ढगाळ वातावरण, विविध भागात पडणारा पाऊस यामुळे हा मोसम हातून निघून जातो की काय, असे वाटू लागले आहे. पिकणारी करवंदे आणि जांभळावर पाऊस पडल्यास ही फळे बेचव होऊन जातात तर ताडफळे गळून खाली पडतात. रानमेवा खाण्याकरिता गावात आलेल्या चाकरमान्यांची पावले रानाकडे वळू लागली असतानाच पावसामुळे हा रानमेवा रुसतो की काय, असे चित्र निर्माण झाले आहे.
महाड तालुक्यात सर्वच भागात करवंदाची झुडपे आहेत. मधूर ही करवंदे कोकण वगळता इतर जिल्ह्यांत तसेच मोठ्या शहरांत मागणी असल्याने येथील आदिवासी ही करवंदे रानात जाऊन काढतात. आदिवासी करवंदे, जांभळे अशी रानफळे विकून चरितार्थ चालवत आहेत.(वार्ताहर)