एपीएमसीतील क्लब नशा हुक्का पार्लरला ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 01:14 AM2021-03-10T01:14:52+5:302021-03-10T01:15:28+5:30
‘लोकमत’ ने मांडला होता प्रश्न : पालिका कारवाई करत असतानाही होती तरुणांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोना काळात सर्व नियम धाब्यावर बसवून गर्दी जमवणाऱ्या क्लब नशा हुक्का पार्लर महापालिकेने सील केला आहे. त्याठिकाणी पोलिसांनी तीनदा कारवाई करूनही हुक्का चालक पोलिसांना जुमानत नव्हता. त्यामुळे शहरात हुक्का पार्लर डोकेदुखी ठरत असल्याचे ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.
स्मार्ट सिटी म्हणून उदयास येत असलेल्या नवी मुंबईत हुक्का पार्लर संस्कृती रुजत आहे. त्याला वेळीच अटकाव घातला जात नसल्याने तरुणाई नशेच्या आहारी जात आहे. अशातच शहरात कोरोनाचा प्रभाव असतानाही हुक्का पार्लर सुरू ठेवून त्याठिकाणी गर्दी जमवली जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यानुसार शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी हुक्का पार्लरवर कारवाईचा धडाका लावला आहे. परंतु पोलिसांच्या कारवाईनंतर काही मिनिटातच पुन्हा त्याठिकाणी गर्दी जमत होती. यावरून हुक्का पार्लर चालकांवर कायद्याचा धाक नसल्याचे दिसून येत होते.
त्याचप्रमाणे एपीएमसीमधील क्लब नशा या हुक्का पार्लर चालकांकडूनदेखील सर्व नियम पायदळी तुडवत तरुणांची गर्दी जमवली जात होती. याबाबत सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन महापालिकेच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी त्याठिकाणी पाहणी केली. यावेळी मोठ्या संख्येने तरुण हुक्का ओढत बसल्याचे आढळून आले. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर राखले जात नव्हते. त्यानुसार सातत्याने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेने या हुक्का पार्लरवर कारवाई करून ते सील केले आहे. तीन दिवसांपूर्वीच सीबीडी येथेदेखील एका हुक्का पार्लरवर कारवाई झाली होती. पालिकेने अशाचप्रकारे कारवाईचा धडाका सुरू ठेवल्यास हुक्का चालकांच्या मुजोरीला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.