मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंदा म्हात्रे यांनी घेतली भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:47 PM2019-09-09T23:47:52+5:302019-09-09T23:49:43+5:30
गावठाणांच्या प्रश्नांवर चर्चा : समाज माध्यमांत तर्कवितर्क सुरू
नवी मुंबई : बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. बेलापूर मतदारसंघामध्ये गणेश नाईक यांना उमेदवारी दिली जाऊ नये यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू होती. परंतु म्हात्रे यांनी आम्ही गावठाण विस्तारासाठीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचे निश्चित झाल्यापासून नवी मुंबईमधील राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. शहरातील दोनही मतदारसंघामध्ये नाईक परिवाराला उमेदवारी दिली जाणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. यामुळे शिवसेनेमध्येही असंतोष निर्माण झाला आहे. शिवसेनेने दोन्ही मतदारसंघ भाजपला सोडण्यास विरोध केला आहे.
बेलापूर मतदारसंघावर दावा केला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते.
बेलापूर मतदारसंघातून गणेश नाईकांना उमेदवारी दिली जाऊ नये यासाठी आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. समाजमाध्यमांवरून याविषयी उलटसुलट चर्चाही सुरू होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीविषयी माहिती घेण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या भेटीमध्ये कोणताही राजकीय मुद्दा नसल्याचे स्पष्ट केले.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आम्ही सोडविले आहेत. काही प्रश्न प्रलंबित असून तेही लवकर सोडविले जावे यासाठी ही भेट घेतली होती. गावठाण विस्तारासाठीचा अध्यादेश लवकर करावा अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. यासाठीच भेट घेतली असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. गावठाण विस्ताराच्या प्रश सोडविण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. या बैठकीला पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, राजेश पाटील, दत्ता घंगाळे व इतर पदाधिकारीही उपस्थित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला आहे. अनेक प्रश्न सोडविले असून उर्वरित प्रश्न लवकर सोडविण्यासाठी आम्ही सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये कोणताही राजकीय उद्देश नव्हता.
- मंदा म्हात्रे, आमदार बेलापूर