नवी मुंबई : आपल्या देशाला तक्षशिला, नालंदा, सोमपुरा यांसारख्या जागतिक दर्जाच्या समृद्ध विद्यापीठांचा इतिहास आहे. हा वारसा आताच्या विद्यापीठांनी पुढे न्यायला हवा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी नेरूळ येथे केले. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या पदवीदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल, तर लाेकमत मीडियाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांना समाजसेवा, माध्यमक्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती विजय पाटील यांच्या हस्ते राज्यपालांच्या उपस्थितीत डी. लिट या मानद उपाधीने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांनी मुख्यमंंत्री शिंदे आणि दर्डा यांनी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगून दोघांचे डी. लिट पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय पाटील, कुलगुरू डॉ. वंदन मिश्रा-चतुर्वेदी, डॉ. नंदिता पालशेतकर, प्र-कुलगुरू शिवानी पाटील यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख सर्वश्री डॉ. गौरांग मिस्त्री, महेश कुमार हरत, एन. डी. पाटील, देवयानी गुप्ता, वाणी कामत आदी उपस्थित होते. प्रत्येक जण पदवी घेतल्यानंतर नव्या आयुष्यात पाऊल ठेवतात. यानंतर आलेले दायित्व यशस्वीपणे निभावण्याची महत्त्वाची जबाबदारी असते. ती आज पदवी मिळालेले सर्व विद्यार्थी पार पाडतील, असा विश्वास व्यक्त करून राज्यपाल बैस यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने शिक्षणच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिल्याचे सांगितले.
याप्रसंगी खा. श्रीकांत शिंदे, आ. प्रशांत ठाकूर, लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय मोहिते यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मी माणुसकीने श्रीमंत : एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कृतज्ञतापूर्वक भाषणात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे आभार मानले. ते म्हणाले, डी. लिट हा मोठा सन्मान आहे. तो पाहण्यासाठी वडील संभाजी शिंदेंसह धर्मपत्नी आणि मुलगा खा. श्रीकांत शिंदे आवर्जून उपस्थित आहेत. ही पदवी मी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला सुपूर्द करतो. आताही मुख्यमंत्री असलो तरी एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. श्रीमंतांच्या यादीत माझे नाव आले नाही, तरी चालेल; पण माणुसकीच्या यादीत ते अग्रभागी असेल, कारण मी माणुसकीने श्रीमंत माणूस आहे.
समाजकार्य आणखी पुढे नेण्यास प्रेरणा : विजय दर्डा
डी. लिट पदवीने सन्मानित झाल्यानंतर सत्काराला उत्तर देताना लोकमत समूहाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांंनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे आभार मानले. आपल्या आयुष्यात हा अतिशय प्रतिष्ठेचा, आदराचा, प्रेरणादायी पुरस्कार आहे. खास समाजसेवेसाठीच डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाने माझा डी. लिट पदवी देऊन सन्मान केल्याने मला माझे वडील स्व. जवाहरलाल दर्डा यांची आठवण येत आहे, असे सांगून विजय दर्डा यांनी ही पदवी मी पत्रकारितेसह शिक्षण, समाजकार्य क्षेत्रात जवाहरलाल दर्डा यांचे विचार पुढे नेल्याबद्दलची श्रद्धांजली आहे, असे समजतो, असे स्पष्ट केले.