नातवाच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री नवी मुंबईत; केंद्राशी ‘व्हीसी’द्वारे संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 05:52 AM2022-07-18T05:52:25+5:302022-07-18T05:53:20+5:30
एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगलाही उपस्थिती लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवावर नवी मुंबईतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी रविवारी रुग्णालयास भेट दिली. यावेळी मनपा मुख्यालयातून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगलाही उपस्थिती लावली.
मुख्यमंत्रिपदावर नियुक्ती झाल्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच नवी मुंबईत दाखल झाले. त्यांच्या नातवावर नेरूळमधील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे त्याच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी ते येथे आले होते. ‘आजादी का अमृत महोत्सव’अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाबाबत केंद्रीय सांस्कृतिक विभागाशी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकही रविवारी होती. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल व केंद्रीय सांस्कृतिकमंत्री किशन रेड्डी उपस्थित राहणार होते. यामुळे मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला साडेतीन वाजता भेट देऊन आयुक्त दालनातून व्हीसीमध्ये सहभागी झाले.
‘हर घर तिरंगा’ अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुख्यमंत्री नवी मुंबईत आले असताना त्यांना व्हीसीला उपस्थित राहायचे असल्याने ते मुख्यालयात आले होते.