नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांचा दुजोरा;महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 03:07 PM2022-06-28T15:07:25+5:302022-06-28T15:09:28+5:30
या विमानतळाच्या नामकरणावरून बराच वाद रंगला आहे.
वैभव गायकर, पनवेल: नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त करीत आहेत. याबाबत अनेक वेळा मोर्चे काढण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर सेना व प्रकल्पग्रस्त असा संघर्ष निर्माण झालेला असल्याचे पाहायला देखील मिळाले आहे. या मागणीबाबत स्थानिक पनवेल उरण महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज (२८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे या भूमिकेवर शिवसेना ठाम होती. मात्र आज शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिबा यांच्या नावाला होकार दिल्याचा दावा महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
या शिष्टमंडळात शेकापचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे बबन पाटील, काँग्रेसचे अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, सपाचे अनिल नाईक यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. विमानतळाच्या नामकरणाचा विषय बैठकीत पुढे आल्यावर सिडकोने केलेला ठराव हा तात्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून केला होता. शासकीय स्तरावर असा कोणताही निर्णय झाला नसून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लवकर दि. बा. पाटील यांच्या नावाने हा ठराव घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले असल्याचा दावा पनवेल काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित पाटील यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ठराव करताना मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतले नसल्याचे मख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाल्याचा प्रकार यात दिसून येतो अशी चर्चा आता रंगली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाला होकार दिल्याच्या दाव्याच्या वृत्तानंतर प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. दि. बा. पाटील यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांनी जो लढा उभारला त्याला एका अर्थी यश आल्याची भावना दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.