Navi Mumbai Di Ba Patil International Airport: नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्त करीत होते. याबाबत अनेक वेळा मोर्चे काढण्यात आले. स्थानिक पातळीवर शिवसेना व प्रकल्पग्रस्त असा संघर्ष निर्माण झालेला असल्याचे पाहायला देखील मिळाले. अखेर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ या नामकरणास मान्यता देण्यात आली. नगरविकास विभागाकडून यावर मंजूरी देण्यात आली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे या भूमिकेवर शिवसेना ठाम होती. पण प्रकल्पग्रस्तांनी दुसरीकडे या मागणीबाबत स्थानिक पनवेल उरण महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने काल (२८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांनी दि. बा. यांच्या नावाला होकार दिल्याचा दावा महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी कालच केला होता. त्यानंतर नगरविकास विभागाकडून या संदर्भातील नावाला आज मंजूरी देण्यात आली. आता केंद्र सरकारकडून यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात शेकापचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे बबन पाटील, काँग्रेसचे अभिजित पाटील, राष्ट्रवादीचे सुदाम पाटील, सपाचे अनिल नाईक यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. विमानतळाच्या नामकरणाचा विषय बैठकीत पुढे आल्यावर सिडकोने केलेला ठराव हा तात्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून केला होता. शासकीय स्तरावर असा कोणताही निर्णय झाला नसून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लवकर दि. बा. पाटील यांच्या नावाने हा ठराव घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले होते. त्यानुसार, आज प्रकल्पग्रस्तांच्या या मागणीला मंजुरी मिळाली.