सहकार सहनिबंधकांचा गृहनिर्माण संस्थेला दणका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 01:36 AM2020-08-17T01:36:40+5:302020-08-17T01:36:46+5:30
आकारलेले अतिरिक्त शुल्क अर्जदाराला परत करण्याचे निर्देश सहनिबंधक डॉ. केदार जाधव यांनी संबंधित गृहनिर्माण सोसायटीला दिले.
नवी मुंबई : बिनभोगवटा शुल्काच्या नावाखाली मनमानी पद्धतीने सेवा शुल्क आकारणाऱ्या कोपरखैरणेतील एका गृहनिर्माण संस्थेला सिडकोच्या सहकारी सहनिबंधकांनी दणका दिला आहे. आकारलेले अतिरिक्त शुल्क अर्जदाराला परत करण्याचे निर्देश सहनिबंधक डॉ. केदार जाधव यांनी संबंधित गृहनिर्माण सोसायटीला दिले.
कोपरखैरणे सेक्टर १४ येथील न्यू कृष्णा को.आॅप. हौसिंग सोसायटीतील सदस्य अनुज गुप्ता आणि रमा गुप्ता यांनी सोसायटीच्या मनमानी शुल्क आकारणीच्या विरोधात सहकारी सहनिबंधक कार्यालयाकडे दाद मागितली होती. संबंधित गृहनिर्माण संस्थेचे आपण नियमाने सभासद आहोत, तसेच संस्थेची देणी नियमितपणे भरली जातात. असे असतानाही संस्थेने १ फेब्रुवारी, २0१९च्या देयकात कोणतीही पूर्वसूचना न देता वाढ केली. नियमाप्रमाणे सेवा शुल्काच्या केवळ दहा टक्के बिनभोगवटा शुल्क आकारणे बंधनकारक असतानाही अतिरिक्त शुल्काची आकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, संस्थेने चौरस फुटांच्या अधारे सेवा शुल्काची आकारणी केली आहे. अशा प्रकारची आकारणी बेकायदा असल्याचे अनुज आणि रिमा गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते. गृहनिर्माण संस्थेने अर्जदाराचे हे सर्व आरोप फेटाळून लावत संस्थेचा कारभार सहकारी संस्था अधिनियमानुसारच सुरू असल्याचा दावा केला आहे, तसेच अर्जदाराने दाखल केलेली तक्रार खोटी असल्याचे म्हटले आहे. अर्जदाराची भूमिका नेहमीच संस्थेच्या विरोधात राहिली आहे. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत अनेक प्राधिकरणांकडे संस्थेच्या विरोधात तक्रारी केल्याचे सोसायटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.