शहरातील कोचिंग क्लासेस सुरूच; विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 02:19 AM2021-03-28T02:19:10+5:302021-03-28T02:19:46+5:30
कारवाई करण्याची मागणी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस सुरू करण्यास कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही. परंतु, नियमांची पायमल्ली करत अनेक कोचिंग, संगीत क्लासेस, कॉम्पुटर इन्स्टिट्यूट सुरू आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असून ऑफलाईन सुरू असलेल्या क्लासेसवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
नवी मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मास्क, सोशल डिस्टन्स आदी सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेच्या माध्यमातून केले जात आहे. परंतु, नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे दररोज रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईसाठी शहरातील प्रत्येक नोडमध्ये विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली असून शुक्रवार, २६ मार्चपासून पोलीस आणि महापालिका यांच्या माध्यमातून संयुक्त कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याच्या सूचना शासन आणि महापालिकेच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. मात्र, डिसेंबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर नियम डावलून शहरातील अनेक मोठे आणि घरगुती कोचिंग क्लासेस प्रत्यक्षात सुरू करण्यात करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून नेरुळ विभागातील अनेक क्लासेसमध्ये इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थी प्रत्यक्षात शिक्षण घेत आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या अनुषंगाने पूर्वतयारीदेखील करून घेतली जात असून यामुळे क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे. विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. ऑफलाईन सुरू असलेल्या कोचिंग क्लासेसवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.-
कोचिंग किंवा अन्य क्लासेस ऑफलाईन सुरू करण्यास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑफलाईन सुरू असलेले कोचिंग क्लासेस बंद करावेत. त्याबाबचे आदेश लवकरच काढण्यात येतील. अभिजित बांगर (आयुक्त, नवी मुंबई महापालिका)