स्वीकृत सदस्यत्वासाठी युती-आघाडीत चुरस
By admin | Published: May 6, 2015 12:52 AM2015-05-06T00:52:05+5:302015-05-06T00:52:05+5:30
नवी मुंबई महापालिकेत पाठविण्यात येणाऱ्या स्वीकृत सदस्यांच्या पाच जागांसाठी युती आणि आघाडीकडून १० जणांनी मंगळवारी अर्ज भरले.
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत पाठविण्यात येणाऱ्या स्वीकृत सदस्यांच्या पाच जागांसाठी युती आणि आघाडीकडून १० जणांनी मंगळवारी अर्ज भरले. यात राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, साबू डॅनिअल यांच्यासह सूरज पाटील व घनश्याम मढवी यांचा समावेश आहे. तर सर्वांनाच धक्का देऊन ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे यांच्यासह अल्पसंख्याकांचा चेहरा असलेले कट्टर शिवसैनिक समीर बागवान यांना डावलून मनोज हळदणकर, राजेश आव्हाड, राजेश शिंदे, विलास लोके यांनी शिवसेनेकडून अर्ज भरले. याशिवाय काँगे्रसकडून अनिल कौशिक आणि भाजपाकडून निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्याविरोधात बंडखोरी करणारे दिलीप तिडके यांनीही अर्ज भरले. संख्याबळानुसार युतीचे दोन आणि काँगे्रस-राष्ट्रवादी-अपक्षांच्या आघाडीचे प्रत्येकी तीन सदस्य निवडून येऊ शकतात.
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीकडून अनंत सुतार आणि महापालिका निवडणूक काळात शिवसेनेच्या बंडखोरांचे नेतृत्व करून एका बंडखोरास निवडून आणणारे घनश्याम मढवी या दोघांची निवड निश्चित मानली जात आहे. तिसऱ्या जागेसाठी सूरज पाटील, साबू डॅनिअल यांच्यासह काँगे्रसकडून अर्ज भरणारे अनिल कौशिक यांच्यात चुरस आहे. राष्ट्रवादीने एक जागा काँगे्रसला सोडली तर कौशिक सभागृहात जाऊ शकतात. मात्र त्यांना पाच अपक्षांची मर्जी जिंकावी लागणार आहे. तर शिवसेनेकडून मनोज हळदणकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. दुसऱ्या जागेसाठी राजेश आव्हाड, राजेश शिंदे, विलास लोके यांच्यासह भाजपाच्या दिलीप तिडके यांच्यात चुरस आहे. त्यातच बंडखोर तिडकेंना भाजपाने स्वीकृत नगरसेवक म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतल्याने युतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. कारण शिवसेनेने आपल्या ४१ बंडखोरांची हकालपट्टी केली होती. तर उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतरही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना पक्षातून न काढता अभय दिले होते. त्यातच आता त्यातील एका बंडखोरास स्वीकृत सदस्यासाठी अर्ज भरावा लावल्याने शिवसेनेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. (खास प्रतिनिधी)