लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उधारीच्या रकमेवरून नारळ व्यावसायिकावर चाकूने हल्ला झाल्याची घटना एपीएमसी येथे घडली आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेमध्ये नारळ व्यावसायिक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अगोदरची उधारी मागितल्याने झालेल्या वादातून जुईनगर येथे राहणाऱ्या तरुणाने त्याच्यावर चाकूने दोन वार केले.बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास एपीएमसी मसाला मार्केट येथील के १८ गाळ्यात हा प्रकार घडला. घाटकोपर येथे राहणारे आशिष धराणी (४२), यांचा त्या ठिकाणी नारळविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून शंकर मालुसरे हा नारळ खरेदी करायचा. तो जुहूगावचा राहणारा असून, त्याचा भायखळा येथे नारळविक्रीचा व्यवसाय आहे. मात्र, या व्यवहारातील सुमारे चार लाखांचे त्याचे बिल थकीत होते. ही थकबाकी मिळवण्यासाठी धराणी यांनी काही दिवसांपूर्वी मालुसरेला फोन केला होता. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वादही झाला होता. यावरून मालुसरे हा बुधवारी सकाळी धराणी यांच्या गाळ्यावर गेला होता. त्या ठिकाणी पुन्हा दोघांमध्ये वाद झाला असता, मालुसरे याने सोबत आणलेल्या चाकूने त्यांच्या छाती व पोटावर वार केले. यानंतर तो पळ काढण्याच्या तयारीत असतानाच त्या ठिकाणी असलेल्या माथाडी कामगारांनी त्याला पकडून ठेवून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्थिक वादातून नारळविक्रेत्यावर हल्ला
By admin | Published: June 29, 2017 3:02 AM